Shivendraraje Bhosale : रस्ते निर्माण करताना गुणवत्तापूर्ण कामाला प्राधान्य : मंत्री शिवेंद्रराजे भोसले
esakal January 01, 2025 03:45 PM

सातारा : प्रत्येक जिल्ह्यातील ग्रामीण भाग रस्त्यांच्या माध्यमातून शहरांशी जोडून ग्रामीण भाग अधिकाधिक विकास प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केला जाईल. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून रस्त्यांचे जाळे निर्माण करताना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण कामाला प्राधान्य राहील. मंत्रिपदाच्या माध्यमातून राज्यात उठावदार काम करणार असल्याची ग्वाही सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.

मुंबई मंत्रालयात आज सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पदभार स्वीकारला. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, सचिव (रस्ते) सदाशिव साळुंखे, सचिव (इमारती) संजय दशपुते, मुख्य अभियंता (कोकण) शरद राजभोज, मुख्य अभियंता (मुंबई) राजेंद्र रहाणे, अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, सातारा कार्यकारी अभियंता (पूर्व) श्रीपाद जाधव, कार्यकारी अभियंता (पश्चिम) राहुल अहिरे तसेच जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजू भोसले, फिरोज पठाण, अक्षय जाधव, ओंकार भंडारे उपस्थित होते.

शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वी मंत्रालयातील महापुरुषांच्या प्रतिमेस अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कामकाजाचा आढावा घेतला.

यावेळी शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिपदी काम करण्याची जबाबदारी सोपवली आहे. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी रस्ते महत्त्वाचे आहेत. बांधकाम विभागाच्या माध्यमातून राज्यभरात रस्त्याचे जाळे निर्माण केले जाईल.’’

रखडलेला महामार्ग पूर्णत्वास नेऊ

राज्याचा जास्तीतजास्त ग्रामीण भाग शहरांना जोडण्याचा प्रयत्न राहील. राज्यात दर्जेदार व गुणवत्तापूर्ण कामे करण्याला प्राधान्य राहील. सातारा-पुणे या राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले काम पूर्णत्वाला नेले जाईल. सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्वच जिल्ह्यातील विकासकामांना चालना देणार असल्याचेही मंत्री शिवेंद्रराजेंनी स्पष्ट केले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.