Koregaon Bhima: शारीरिक संघर्ष संपला मात्र मानसिक सुरूच...कोरेगाव भीमा विजयस्तंभाला अभिवादन केल्यानंतर प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?
esakal January 01, 2025 03:45 PM

कोरेगाव भीमा येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही 1 जानेवारी शौर्यदिनानिमित्त मोठी गर्दी जमली. राज्यभरातील विविध भागांमधून नागरिकांनी विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी हजेरी लावली. सामाजिक न्यायाचा प्रतीक असलेल्या या ठिकाणी अनेक बांधव एकत्र येऊन ऐतिहासिक लढ्याला श्रद्धांजली वाहतात. यंदाच्या कार्यक्रमातही प्रकाश आंबेडकर यांनी विजयस्तंभाला अभिवादन करताना महत्त्वपूर्ण विधाने केली.

‘संघर्ष अद्याप मानसिक पातळीवर सुरू आहे’

विजयस्तंभाला अभिवादन केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, “दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अभिवादनासाठी आलो आहे. शौर्यस्तंभाला अभिवादन करण्यासाठी हजारो लोकांची उपस्थिती हा संघर्ष जिवंत असल्याचे निदर्शक आहे. शारीरिक संघर्ष संपला असला तरी मानसिक संघर्ष अद्याप सुरूच आहे.”

ते पुढे म्हणाले, “ही चळवळ कायम सुरू राहिली पाहिजे. समजतील विषमता आणि अमानुष वागणुकीच्या विरोधात हा लढा आहे. शौर्यदिनानिमित्त सरकार आपल्या परीने सुविधा पुरवते, मात्र त्या अपुऱ्या पडत आहेत. पुढील वर्षी या सुविधा अधिक चांगल्या होण्याची अपेक्षा आहे. बार्टी सारख्या संस्थांनी यामध्ये लक्ष घालावे.”

समाजातील विषमता संपविण्याचा आंबेडकरांचा संदेश

आंबेडकरांनी समाजातील विषमता संपविण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. त्यांनी परभणी आणि बीड येथील अलीकडच्या घटनांवर भाष्य करताना सांगितले की, “मानसिक बदल होत नसल्यामुळे समाजात अनेक घटनांचा उदय होत आहे. मानवतावादी लढा उभा करणाऱ्यांनी पुन्हा पुढे यावे म्हणजे या गोष्टींचा अंत होईल.”

वाल्मिक कराड अटक प्रकरणावर प्रकाश आंबेडकरांचे भाष्य

बीड प्रकरण आणि वाल्मिक कराड यांच्या अटक प्रकरणावर भाष्य करताना आंबेडकर म्हणाले, “या प्रकरणाला वेगळा रंग दिला जात आहे. पोलिसांना कराड कुठे होता हे माहीत नव्हते, हे आश्चर्यकारक आहे. गुप्तचर यंत्रणांनी वारंवार आपले अपयश दाखवू नये. कराड प्रकरणी सरकारवर प्रचंड दबाव आहे, मात्र मुख्यमंत्री याला बळी पडू नयेत. हे पोलिस खात्याचे अपयश आहे.”

केंद्र आणि राज्य सरकारवर टीका

आंबेडकर यांनी केंद्र व राज्य सरकारवर जोरदार टीका केली. “सध्याचे केंद्र आणि राज्य सरकार भाजपचे असून त्यांच्यात मतभेद अधिकच वाढत आहेत. सगळ्यांनी एकत्र येऊन प्रयत्न केले तरच ही समस्या सुटू शकते,” असे त्यांनी नमूद केले.

शौर्यदिनाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीची आठवण

1 जानेवारी 1818 रोजी भीमा कोरेगाव येथे झालेल्या ऐतिहासिक लढाईत दलित सैनिकांनी इंग्रजांसोबत मिळून पेशव्यांचा पराभव केला. हा विजय दलित समाजासाठी स्वाभिमानाचा प्रतीक बनला. या विजयाच्या स्मरणार्थ दरवर्षी विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी देशभरातून लोक येतात.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.