मुंबई : नाराज असल्याची चर्चा असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहनिर्माण विभागाचा कारभार हातात घेत आज आढावा बैठक घेतली. मुंबईतील रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश शिंदे यांनी आज अधिकाऱ्यांना दिले. राज्य शासनाच्या माध्यमातून गिरणी कामगारांसाठी सुमारे एक लाख घरे बांधण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
‘सह्याद्री’ अतिथिगृह येथे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली गृहनिर्माण विभागाची आढावा बैठक घेण्यात आली. सुमारे तीन तास चाललेल्या या बैठकीत उपमुख्यमंत्र्यांनी विविध योजनांचा आणि प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेतला. मुंबईच्या विकासासाठी लवकरच क्लस्टरची योजना सुरू करण्यात येणार असून या योजनेच्या माध्यमातून मुंबईत लक्षावधी घरे उपलब्ध होतील, असे शिंदे यांनी या बैठकीबद्दल बोलताना सांगितले.
गिरणी कामगारांसाठी एक लाख घरे बांधण्यात येणार असून त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असल्याचेही त्यांनी सांगितले. जे गिरणी कामगार त्यांच्या मूळ गावी स्थलांतरित झाले आहेत त्यांना त्यांच्या गावी घर देता येईल का याबाबत तपासणी करावी, तसेच गिरणी कामगार युनियनसोबत बैठकीचे आयोजन करावे, असे निर्देश शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प, पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प, मोतीलाल नगर १, २ व ३ वसाहतींचा पुनर्विकास, कामाठीपुरा क्षेत्राचा म्हाडामार्फत पुनर्विकास, पोलिसांसाठी घरे, गिरणी कामगारांसाठी घरकुल योजना, जीटीबी नगर सोयम येथील पुनर्वसन प्रकल्प, प्रधानमंत्री आवास योजना आदीबाबत आढावा घेतला.