ओंकार राऊत आणि चेतना भट
नाती, मैत्री यांचे धागे घट्ट होतात ते एकेक प्रसंगांमुळे, छोट्या छोट्या गोष्टींमुळे. अनेक कलाकृतींपासून उद्योगांपर्यंत वेगवेगळ्या गोष्टी एकत्रपणे करणाऱ्या व्यक्तींनी एकमेकांविषयी व्यक्त केलेल्या भावनांचं हे सदर आजपासून दर आठवड्याला.
मैत्री ही एक अनमोल भावना आहे, जी शब्दांमध्ये व्यक्त करता येणं तितकंसं सोपं नसतं. ‘सोनी मराठी’ वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या मंचावरून चमकलेली चेतना भट आणि ओंकार राऊत यांची मैत्री हे एक सुंदर उदाहरण आहे.
या दोघांच्या निखळ मैत्रीच्या बंधामुळे त्यांच्या कामातल्या रसायनाला वेगळी उंची मिळाली आहे. एकमेकांबद्दलच्या आदरानं आणि परस्परांमधल्या समजुतीनं बहरलेली ही मैत्री त्यांच्या प्रत्येक प्रेक्षकाच्या मनाला भिडते.
चेतना सांगते की, ‘दम असेल तर’ या चित्रपटादरम्यान २०१२मध्ये तिची आणि ओंकारची ओळख झाली. मात्र, मैत्रीचा खरा बंध तयार झाला तो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून. या शोमध्ये त्यांनी अनेक स्किट्स एकत्र सादर केली. ‘लोचन मजनू’ हे स्किट त्यांचं खास आवडतं काम ठरलं.
चेतना म्हणते, ‘‘आम्ही एकत्र इतकं काम केलं, की आमच्यात एकमेकांना समजून घेण्याची खास क्षमता निर्माण झाली. कामादरम्यान मला आधीच माहिती असतं की, ओंकार कसा रिअॅक्ट करेल. यामुळे माझं काम अधिक सोपं होतं. ओंकार व्यक्ती म्हणून खूप चांगला आहे. त्याचं स्पष्टवक्तेपण मला विशेष आवडतं. अर्थात त्याचं असं स्पष्ट बोलणं माझ्यासोबत मात्र कधीच तुटक वाटलं नाही. तो नेहमीच माझ्याशी प्रेमानं वागतो.’’
चेतनाला ओंकारचं सेटवरचं वागणंही आवडतं. ओंकार सगळ्यांसोबत मस्ती करताना त्याचा दिलखुलास स्वभाव दाखवतो; पण त्याच वेळी इतर कलाकारांना सांभाळून घेतो. चेतना एक उदाहरण देताना सांगते, ‘‘आमच्या ‘एमएसजे लाईव्ह’दरम्यान, माझी एकामागोमाग एक अशी स्किट्स होती आणि मला त्याच वेळी अँकरिंगसुद्धा करायचं होतं. माझी खूप धावपळ चालली होती. तेव्हा ओंकारनं मला थांबवलं आणि शांत राहायला सांगितलं. तो म्हणाला, ‘थोडं उशिरा स्टेजवर गेलीस तरी चालेल; पण गोंधळ करू नकोस.’ त्यानं दाखवलेल्या या समजूतदारपणामुळे माझा ताण कमी झाला.’’
ओंकार राऊतच्या मते, चेतना ही एक अत्यंत गोड स्वभावाची व्यक्ती आहे. तो म्हणतो, ‘‘चेतनाचं सगळ्यांशी प्रेमाने वागणं तिच्या स्वभावाची खासियत आहे. ती कधीच कोणाला दुखावत नाही, उलट ती नेहमीच इतरांच्या मदतीला धावून जाते. तिच्या व्यक्तिमत्त्वामुळे आमचं काम करणं अधिक सोपं झालं आहे आणि व्यक्तिमत्त्वाच्या बाबतीत सांगायचं झालं तर आम्ही अगदी एकमेकांच्या विरुद्ध आहोत.’’
तो सांगत होता, ‘‘कधी कोणाच्या घरी आम्ही सर्व मित्र-मैत्रिणी पार्टी करत असलो, तर बऱ्याच वेळा आपल्याला पंखा चालू किंवा बंद करायचा वगैरेसुद्धा कंटाळा येतो, उठायला नको वाटतं. मग अशा वेळी आमची चेतनाच स्वतःहून पुढे येते. ती सगळ्यांशी इतक्या प्रेमानं वागते, की तिला कोणी नाकारूच शकत नाही.’’
चेतना आणि ओंकार या दोघांनीही मैत्रीचं वर्णन करताना एक महत्त्वाचा मुद्दा मांडला. ‘‘मैत्री म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या गुण-दोषांसहित त्याला स्वीकारणं. एखाद्या गोष्टीबद्दल स्पष्ट मत सांगणं आणि एकमेकांच्या विचारांचा आदर करणं, हीच खरी मैत्री असते,’’ असं हे दोघं म्हणतात.
(शब्दांकन : मयूरी गावडे)