म्हसवड : तुम्ही आम्हाला ३६ लाख रुपये द्या, तुम्हाला हवेतून पैशाचा पाऊस पाडून त्याचे ३६ कोटी रुपये करून देतो, अशी बतावणी करून दोन भोंदूबाबांनी पाच जणांना ३६ लाख रुपयांचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत म्हसवड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल होताच पोलिसांनी संबंधितांवर गुन्हा दाखल केला आहे. दाखल फिर्यादीवरून मंगेश गौतम भागवत (रा. कळस, ता. इंदापूर) आणि सर्जेराव संभाजी वाघमारे (रा. म्हसवड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत म्हसवड पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, की कांता वामन बनसोडे (रा. देवापूर, ता. माण) यांनी फिर्याद दिली आहे. म्हसवड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नोकरीत असताना माझ्या परिचयाचा सर्जेराव वाघमारे हा अधूनमधून माझ्याकडे येत असे. त्या वेळी त्याने मला मंगेश गौतम भागवत (रा. कळस) हा मायाक्का देवीचा पुजारी असून, ते माझ्या ओळखीचे आहेत, ते दैवी शक्ती व जादूटोण्याद्वारे पैशाचा पाऊस पाडून आपल्याकडील रक्कम २० पट करून देतात, असे सांगितले.
त्या वेळी मी त्यास माझा अशा गोष्टींवर विश्वास नसल्याचे सांगून टाळाटाळ केली; परंतु ता. एक मार्च २०२३ ला मंगेश भागवत व सर्जेराव वाघमारे माझ्याकडे आले. त्यांनी मला आणखी काही लोकही पैशांचा पाऊस पाडून घेण्यास इच्छुक असल्याचे सांगितले. त्यानुसार हरिभाऊ रामचंद्र काटकर (रा. नरवणे, ता. माण), काशिनाथ पवार व सुनील धोतरे दोघे (रा. माळेगाव, ता. बारामती) यांच्याशी परिचय झाला.
आठ मार्च २०२३ ला आम्ही सर्वजण म्हसवड येथे एकत्र आलो. त्यानंतर ता. एक ऑगस्ट २०२३ ला मंगेश भागवत व सर्जेराव वाघमारे हे आमच्याकडे आले आणि त्यांनी पैशांचा पाऊस पाहण्यासाठी माझ्या घरी कळस येथे चला, असे सांगितले. त्या वेळी आम्ही भागवत याच्या चारचाकी वाहनाने (एमएच १२ व्हीएफ ५४४१) कळस येथे गेलो.
तेथे एका खोलीत हळदी कुंकाचे गोल रिंगण करून त्यामध्ये काळ्या कपड्याच्या बाहुल्या व पिना टोचलेले लिंबं ठेवून आम्हाला रिंगणात बसण्यास सांगितले. सर्जेराव वाघमारेने आमच्या डोळ्यावर पट्टी बांधली. त्यानंतर दोघांनी मंत्र म्हणत पट्टी सोडण्यास सांगितले. त्यावेळी रिंगणामध्ये ५०० रुपयांच्या नोटांच्या बंडलांचा ढीग लागलेला दिसला.
या प्रकाराने खरोखरच पैशाचा पाऊस पाडतात, यावर विश्वास बसला. त्यानंतर मी स्वत: (कांता बनसोडे) २० लाख रुपये, हरिभाऊ रामचंद्र काटकर यांनी दोन लाख रुपये, काशिनाथ पवार यांनी चार लाख रुपये, सुनील धोतरे यांनी दोन लाख रुपये, तर आनंदा शेषराव पाटील यांनी आठ लाख रुपये दिले.