नांदेडमध्ये काँग्रेसला पुन्हा हादरा? माजी आमदार मोहनराव हंबर्डे राष्ट्रवादीच्या वाटेवर
Marathi January 08, 2025 02:24 AM

मोहनराव हंबर्डे : नांदेड जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला पुन्हा एकदा मोठा दणका बसण्याची शक्यता आहे. कारण, काँग्रेसचे माजी आमदार मोहनराव हंबर्डे हे लवकरच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. मोहनराव हंबर्डे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांची मुंबईत भेट घेतली. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

18 जानेवारीला मोहनराव हंबर्डे यांचा छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता

काँग्रेसचे नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आमदार मोहनराव हंबर्डे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेनवर असल्याच्या चर्चा सुरु आहेत. कारण आजच त्यांनी मुंबईत राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांची भेट घेतली. त्यानंतर लवकरच ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. येत्या 18 जानेवारीला मोहनराव हंबर्डे यांचा छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होण्याची दाट शक्यताअसल्याची माहिती सुत्रांनी एबीपी माझाला दिली आहे.

शिवसेना शिंदे गटाच्या आनंद बोंढारकर यांनी केला होता हंबर्डेंचा पराभव

2019 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार मोहन हंबर्डे यांनी नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता. त्यांनी 3592 मतांच्या फरकाने अपक्ष दिलिप व्यंकटराव कंदकुर्ते यांचा पराभव करुन जागा जिंकली.नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा नांदेड लोकसभा मतदारसंघांतर्गत येतो. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार वसंतराव बळवंतराव चव्हाण यांनी नांदेड लोकसभा (एमपी) मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा 59442 मतांनी पराभव करून विजय मिळवला होता. मात्र, मागच्या काही दिवसापूर्वी खासदार वसंतराव बळवंतराव चव्हाण यांचे निधन झाले होते. त्यानंतर पोटनिवडणुकीत वसंतराव बळवंतराव चव्हाण यांच्या मुलाचा कमी मतांच्या फरकाने विजय झाला होता. तर यावेळच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे आमदार मोहन हंबर्डे यांचा पराभव झाला आहे. शिवसेना शिंदे गटाच्या आनंद बोंढारकर यांनी विजय मिळवला आहे. या मतदारसंघात काँग्रेसला मोठा हादरा बसला आहे. नांदडे जिल्ह्यात महाविकास आघाडीचा एकही उमेदवार विजयी झाला नाही.

नांदेड जिल्ह्यात विधानसभेचे 9 मतदारसंघ

दरम्यान, नांदेड जिल्ह्यात विधानसभेचे 9 मतदारसंघ आहेत. यामध्ये किनवट, भोकर, नांदेड दक्षिण, नांदेड उत्तर, नायगाव, हदगाव, लोहा, देगलूर, मुखेड या मतदारसंघाचा समावेश आहे. या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत बहुतेक मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असाच सामना रंगला होता. या जिल्ह्यातील लढतीकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. मात्र, सर्वच जागांवर माहयुतीनं वर्चस्व मिळवलं आहे.

महत्वाच्या बातम्या:

नांदेड दक्षिणमध्ये आनंद बोंढारकर विजयी, काँग्रेसच्या मोहन हंबर्डेंना पराभवाचा धक्का

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.