Eknath Shinde: ठाकरेंना पुन्हा खिंडार; राज्यभरातीत स्थानिक नेत्यांनी घेतला शिवसेनेत प्रवेश
esakal January 06, 2025 03:45 PM

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ५ : आता जनताच ठरवेल खरी शिवसेना कुणाची, असे वक्तव्य करणाऱ्यांना विधानसभा निवडणुकीत जनतेनेच दाखवून दिले खरी शिवसेना कुणाची आहे, असा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला.

शिवसेना ठाकरे गटातील नवी मुंबई, पालघर, मुरबाड, धुळे शहर, धुळे ग्रामीण, साक्री, परभणी येथील विविध पदाधिकाऱ्यांनी आज ठाण्यातील आनंद आश्रमात शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे स्वागत करताना आपले मत व्यक्त केले. राज्यातील तमाम लाडक्या बहिणी, भाऊ, शेतकरी, कष्टकरी अशा सर्व वर्गांतील नागरिकांनी शिवसेनेला भक्कम साथ दिल्याने या निवडणुकीत आपल्या पक्षाचे ५७ आणि तीन सहयोगी पक्षांचे असे ६० उमेदवार निवडून आले.

त्यामुळे जनतेने शिवसेनेला साथ दिली असून, खरी शिवसेना कुणाची आहे हेदेखील दाखवून दिले असल्याचे मत शिंदे यांनी या वेळी बोलताना व्यक्त केले. शिवसेनेला विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळेच राज्यभरातून पक्षात येण्यासाठी कार्यकर्त्यांचा ओघ सुरू झाला असून, त्यामुळेच राज्यभरातील अनेक पदाधिकाऱ्यांचे आता पक्षप्रवेश होत आहेत. ही संख्या वाढत जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या वेळी खासदार नरेश म्हस्के, आमदार राजेंद्र गावित, माजी आमदार रवींद्र फाटक, शिवसेना सचिव आणि उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख भाऊ चौधरी, माजी नगरसेवक राम रेपाळे, नवी मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले, पालघरचे जिल्हाप्रमुख कुंदन संख्ये, उपनेत्या ज्योती मेहेर, जिल्हा संघटिका वैदेही वाढाण, उपनगराध्यक्ष उत्तम घरत आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राज्यभरात ठाकरे गटाला खिंडार


नवी मुंबईतील शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख आणि नवी मुंबई महापालिकेचे माजी नगरसेवक द्वारकानाथ भोईर, माजी नगरसेवक विजयानंद माने, माजी नगरसेविका मेघाली राऊत, कोपरखैरणेचे विभागप्रमुख मधुकर राऊत अशा प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. हा पक्षप्रवेश ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे. दुसरीकडे पालघरमधूनही माजी नगराध्यक्षा प्रियांका पाटील, माजी नगरसेविका दीपा पामळे, शहरप्रमुख प्रवीण पाटील, माजी नगरसेवक तुषार भानुशाली, माजी उपनगराध्यक्ष रवींद्र पाटील, युवासेना शहर संघटक निमिष पाटील तसेच डहाणूतील आदिवासींच्या प्रश्नांसाठी झटणारे युवा एल्गार संघटनेचे अध्यक्ष विराज गडग यांनी शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश केला. धुळे जिल्ह्यातून माजी जिल्हाप्रमुख हिलाल माळी, संदीप चव्हाण, चंद्रकांत मस्के, मनीषा शिरोळे, आधार हाके यांच्यासह अनेक माजी नगरसेवकांनीही शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.