वाळूज (छत्रपती संभाजीनगर) - गावातील तरुणाशी असलेले प्रेमसंबंध मान्य नसल्याने चुलत भावाने एका सतरा वर्षीय बहिणीचा डोंगरावरून ढकलून खून केल्याची घटना वाळूज परिसरात आज दुपारी घडली. ‘ऑनर किलिंग’च्या या घटनेने खळबळ उडाली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही मुलगी बारावीत शिक्षण घेत होती. तिचे वडील पूजापाठ करतात. तिचे गावातील एका तरुणाशी सूत जुळल्याने दोघेही पळून गेले होते. मात्र कुटुंबीयांनी समजूत काढून तिला परत आणले होते. त्यानंतर कुटुंबीयांनी तिला वाळूज परिसरातील वळदगाव येथे तिच्या काकांकडे सोडले होते. काका व चुलतभाऊ ऋषीकेश ऊर्फ वैभव तिला समजून सांगत होते.
वैभवने आज दुचाकीवरून तिला सोलापूर-धुळे महामार्गाजवळील खवड्या डोंगरावर नेले. तो तिची समजूत काढत होता. मात्र ती ऐकत नव्हती. त्यामुळे ऋषिकेशने रागाच्या भरात तिला डोंगरावरून खाली ढकलले. त्यानंतर पळ काढत असताना नागरिकांनी त्याला पकडले व पोलिसांना कळविले. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
जात आडवी आल्याने...
अल्पवयीन मुलगी व तिचा प्रियकर हे वेगवेगळ्या जातीचे होते. त्यामुळे त्यांच्या प्रेमसंबंधाला व लग्नास कुटुंबीयांचा विरोध होता. त्यामुळे दोघेही गावातून पळून गेले होते. मात्र, तिला शोधून कुटुंबीयांनी तिला समजून सांगण्यास सुरूवात केली होती, असेही सांगण्यात आले.