एचएमपीव्ही म्हणजेच ह्यूमन मेटान्यूमो व्हायरस (HMPV) नावाच्या विषाणूच्या संसर्गाची भारतात दोन प्रकरणं आढळली आहेत. कर्नाटकात याचे दोन रुग्ण असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयानं सोशल मीडयावर दिली.
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेला (ICMR) नियमित तपासणीदरम्यान ही प्रकरणं आढळली असल्याची माहिती देण्यात आली आहे.
मात्र, ताप किंवा इतर संसर्गाच्या तसंच श्वसनासंबंधी आजाराच्या प्रकरणांमध्ये कोणत्याही प्रकारची अचानक वाढ दिसून येत नसल्याचंही ICMR नं स्पष्ट केलं आहे.
कर्नाटकात एचएमपीव्हीची दोन प्रकरणं आढळल्यामुळं आता भारतासह जगातील अनेक देशांत याचा संसर्ग असलेले रुग्ण आढळत असल्याचं समोर येत आहे.
लागण झालेले दोन्ही चिमुकलेकर्नाटकात एचएमपीव्हीची लागण झालेले दोन्ही रुग्ण ही एका वर्षापेक्षा कमी वय असलेली लहान बाळं असल्याचं स्पष्ट झालं आहे.
तीन महिन्यांच्या एका नवजात चिमुकलीला ब्रोंकोन्यूमोनिया झाल्यानं तिला बेंगळुरूतील रुग्णायात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, आता तिला सुटी देण्यात आली आहे.
तर दुसऱ्या एका आठ महिन्यांच्या मुलालाही याची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्याची प्रकृती ठिक असल्याचं सांगण्यात आलं आहे.
या चिमुकल्यालाही ब्रोंकोन्यूमोनिया झाल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तपासणीनंतर त्याला एचएमपीव्हीची लागण झाल्याचं स्पष्ट झालं.
या दोन लहान बाळापैकी कुणीही आंतरराष्ट्रीय प्रवास केलेला नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालय उपलब्ध असलेल्या सर्व माध्यमांमधून परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचं सांगण्यात आलं आहे. तसंच जागतिक आरोग्य संघटनाही लक्ष ठेवून असून वेळोवेळी मार्गदर्शन सूचना देत आहे.
गेल्या काही काळात देशभरात वैद्यकीय सेवेचा जो आढावा घेण्यात आला, त्यात श्वसनासंबंधीच्या एखाद्या आजाराचा उद्रेक झाल्यास त्याचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याचं स्पष्ट झालं असल्याचंही सरकारकडून सांगण्यात आलं आहे.
BBC BBC महाराष्ट्र सरकारने जारी केले दिशानिर्देशमहाराष्ट्रात अद्याप एचएमपीव्ही या विषाणूचा एकही रुग्ण आढळलेला नाही. तरीही खबरदारीसाठी सरकारनं काही दिशानिर्देश जारी केले आहेत.
ह्युमन मेटान्यूमो व्हायरस (HPMV) हा श्वसनाच्या तीव्र संसर्गाचं प्रमुख कारण आहे. नेदरलँड्समधील शस्त्रज्ञांनी 2001 मध्ये याची ओळख पटवली होती. हा हंगामी रोग असून त्यामुळं श्वसन संसर्ग आणि सर्दीसारखा त्रास होतो, असं DGHS आणि Director, NCDC, MoH&FW, GOI यांनी जाहीर केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
Getty Images HMPV म्हणजे ह्यूमन मेटान्यूमो व्हायरसखबरदारीचा भाग म्हणून नागरिकांनी काय करावे आणि काय करू नये याबाबत सूचनाही महाराष्ट्र सरकारने दिल्या आहेत.
काय करावे -
- खोकला किंवा शिंका येत असतील तर तोंड किंवा नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरनं झाकून ठेवा.
- साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने वारंवार आपले हात धुवा.
- ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा.
- भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा
- संसर्ग कमी करण्यासाठी बाहेरील हवेसह हवा पुरेशी खेळती राहिल अशा वातावरणाची शिफारस केली आहे.
काय करू नये -
- हस्तांदोलन, टिश्यू पेपर आणि रुमालाचा पुनर्वापर टाळा
- आजारी लोकांशी जवळचा संपर्क साधा
- डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करणे टाळा
- सार्वजनिक ठिकाणी थुंकणे टाळा
- डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं घेणे टाळा
डॉक्टरांचं म्हणणं काय?दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयातील बाल रुग्ण विभागाचे डॉक्टर सुरेश गुप्ता यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना हा काही नवा विषाणू नसल्याचं सांगितलं.
ते म्हणाले की, "याबाबत वीस वर्षांपासून माहिती उपलब्ध आहे. हिवाळ्याच्या काळात याच्या संसर्गाची प्रकरणं समोर येतात. हा फ्लूसारखा विषाणू आहे."
niphtr.mohfw.gov.in भारतीय आरोग्य सेवांचे महासंचालक डॉक्टर अतुल गोयलडॉक्टर सुरेश गुप्ता यांच्या मते, यासाठीही सामान्य सर्दीला दिली जाणारी औषधंच दिली जातात. तसंच आजारी व्यक्तीला आरामाचा सल्ला दिला जातो. बहुतांश प्रकरणांत रुग्णालयात दाखल करण्याचा सल्लाही दिला जात नसल्याचंही त्यांनी सांगितलं.
याच रुग्णालयातील चेस्ट मेडिसिन विभागाचे वरिष्ठ डॉक्टर बॉबी भालोत्रा म्हणाले की, "आतापर्यंत या विषाणूच्या संसर्गाची जी प्रकरणं समोर आली आहेत, त्यात अगदी किरकोळ लक्षणं दिसली."
"पण दम्यामुळं आधीच त्रास असलेले रुग्ण आणि क्रॉनिक ऑब्सट्रक्टिव्ह पल्मनरी डिसिज (सीओपीडी, ज्यात श्वास घ्यायला त्रास होतो) च्या रुग्णांना यामुळं जास्त त्रास होऊ शकतो. त्यांना श्वास घ्यायला त्रास, थकवा आणि ताप अशा समस्यांचा सामना करावा लागू शकतो."
"सध्या भारतात या विषाणूचा जो प्रकार आहे त्यामुळं फार गंभीर संसर्ग होत नाही. ज्याप्रकारे कोविडचा विषाणू गंभीर रुप धारण करत होता, त्यामुळं रेस्पिरेटरी फेल्योर व्हायचं. तसं यात अजून पाहायला मिळालं नाही. चीनमधील या विषाणूचा स्ट्रेन किती घातक आहे तेही काही दिवसांत समजेल."
एचएमपीव्ही विषाणू काय आहे?सायन्स डायरेक्टच्या माहितीनुसार, या विषाणूची उत्पत्ती 200 ते 400 वर्षांपूर्वी चिमणीद्वारे झाली होती. पण तेव्हापासून या विषाणूने स्वतःमध्ये अनेक बदल केले आहेत. आता या विषाणूमुळं चिमण्यांना संसर्ग होत नाही.
अमेरिका सरकारच्या सेंटर फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (सीडीसी) नुसार मानवाला 2001 मध्ये याबाबत माहिती मिळाली होती. म्हणजे याचा संसर्ग मानवाला होऊ शकतो, याची माहिती मिळाली होती.
या विषाणूचा संसर्ग सर्वच वयोगटातील लोकांना होऊ शकतो. यामुळं रुग्णाला ताप, खोकला, नाक चोंदणे, श्वास घ्यायला त्रास होणे याचा सामना करावा लागू शकतो.
Getty Images या विषाणूचा उगम नेमका कुठून झाला याबाबत मात्र अद्याप माहिती नाही.याचा संसर्ग वाढला तर या विषाणूमुळं ब्रोन्काइटिस किंवा न्यूमोनियादेखिल होऊ शकतो.
या विषाणूचा इन्क्यूबेशन पीरियड साधारणपणे तीन ते सहा महिने असतो. पण आजारपणाचा काळ कमी जास्त असू शकतो. संसर्ग किती गंभीर आहे, यावर ते अवलंबून असतं.
एचएमपीव्ही कसा पसरतो?खोकलताना किंवा शिंकताना बाहेर पडणाऱ्या तुषारांतील कणांद्वारे या विषाणूचा प्रसार होतो आणि इतरांना संसर्ग होतो.
हाथ मिळवणे, गळा भेट घेणे किंवा एकमेकांना स्पर्श केल्यानेही हा विषाणू पसरू शकतो.
खोकला किंवा शिंकल्याने एखाद्या भागावर तुषार पडले असतील आणि त्याठिकाणी स्पर्श केलेला हात आपण चेहरा, नाक, डोळे किंवा तोंडाला स्पर्श केला तरीही संसर्ग होऊ शकतो.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.