नवी दिल्लीः कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे. सोबत त्यांनी पक्षाचं नेतेपदही सोडलं आहे. ट्रूडो यांच्यावर मागच्या काही दिवसांपासून आरोप होत होते. त्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला. सोमवारी ट्रूडो यांनी देशाला संबोधित केलं, त्याचवेळी आपला निर्णय जाहीर केला.
अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर ट्रुडो यांच्यावर दबाव वाढला होता. ट्रम्प यांच्याकडून सातत्याने ट्रुडो यांना टार्गेट केलं जात होतं. तर इलॉन मस्क यांनीही ट्रम्प यांच्या विजयानंतर म्हटलं होतं की, ट्रुडो यांचे काउंटडाऊन सुरू झालंय.
लिबरल पार्टीच्या कॉकसच्या बैठकीत ट्रुडो यांना पदावरून हटवलं जाऊ शकतं, असं म्हटलं होतं. ट्रुडोंनी पदावर रहायचं की नाही याबद्दल अर्थमंत्री डॉमिनिक लीब्लॅक यांच्याशी चर्चा केली होती.
कॅनडाच्या संसदेत लिबरल पार्टीचे १५३ खासदार आहेत. तर बहुमताचा आकडा १७० इतका आहे, काही महिन्यांपूर्वी ट्रुडो सरकारला असलेला पाठिंबा न्यू डेमोक्रेटिक पार्टीने काढून घेतला होता. एनडीपी हा खलिस्तानी समर्थक शीख खासदार जगमीत सिंह यांचा पक्ष आहे. आघाडी तुटल्यानं ट्रुडो यांचं सरकार अल्पमतात आलं होतं. पण दुसऱ्या पक्षाने पाठिंबा दिल्यानं त्यांना विश्वास मत जिंकता आलं होतं.