मुंबई: आर्थिक गुंतवणुकीवर अवघ्या सहा ते सात दिवसांत घसघशीत रिटर्न्स देणाऱ्या टोरेस कंपनीने आपला गाशा गुंडाळल्याने हजारो मुंबईकरांना डोक्यावर हात मारुन घेण्याची वेळ आली आहे. या कंपनीने आर्थिक फसवणूक (Mumbai Scam) केल्याचे लक्षात आल्यानंतर सोमवारी टोरेस कंपनीच्या दादरसह मुंबई आणि नवी मुंबईतील कार्यालयांबाहेर मोठी गर्दी जमली होती. टोरेस कंपनीने (Torres Investments) जवळपास 3 हजार कोटींचा घोटाळा केल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये सर्वेश सुर्वे, व्हिक्टोरिया कोवालेन्का, तौफिक रियाझ उर्फ जॉन कार्टर, तानिया कॅसातोवा, व्हॅलेंटिना कुमार यांचा समावेश आहे.
गेल्या काही महिन्यांपासून मुंबईत गुंतवणुकीवर घसघशीत रिटर्न्स देणाऱ्या टोरेस कंपनीच्या बिझनेस मॉडेलची जोरदार चर्चा सुरु होती. टोरेस ही विदेशी कंपनी असून ही कंपनी सोने, हिरे आणि चांदीच्या दागिन्यांच्या विक्रीचा व्यवसाय करते. गेल्यावर्षी या कंपनीने मुंबईत पहिले कार्यालय सुरु केले होते. त्यानंतर मुंबईत टोरेस कंपनीच्या कार्यालयांची चेन तयार झाली होती. अवघ्या सहा ते सात दिवसांमध्ये गुंतवणुकीवर झटपट परतावा मिळत असल्यामुळे अनेकांनी टोरेस कंपनीत लाखो रुपये गुंतवले होते. मात्र, आता या सगळ्यांवर पश्चाताप करण्याची वेळ आली आहे.
टोरेस कंपनी सोने, हिरे आणि चांदीच्या दागिन्यांची विक्री करत असते. मात्र, हे दागिने बनावट होते. याविषयी अनेक गुंतवणुकदारांना माहिती होती. मात्र, आपल्या गुंतवणुकीवर घसघशीत परतावा मिळत असल्याने बहुतांश गुंतवणुकदारांनी याकडे कानाडोळा केला. टोरेस कंपनीत गुंतवणुकदारांना अवघ्या 4000 रुपयांपासून गुंतवणूक करता येत होती. ही कंपनी रविवारी पैसे गुंतवल्यास सोमवार ते शुक्रवारदरम्यान त्याचा परतावा देत असे. सहा लाखांपर्यंतच्या गुंतवणुकीवर ही कंपनी 6 टक्के व्याज देत होती. तर सहा लाखांपेक्षा जास्त गुंतवणूक केल्यास गुंतवणुकदारांना 11 टक्के व्याज मिळत होते.
सुरुवातीच्या काळात टोरेस कंपनीने उच्चभ्रू इमारतीत घरे, गाड्या आणि दागिने असा आकर्षक परतावा देऊन गुंतवणुकदारांचा विश्वास संपादन केला. त्यामुळे अनेकांनी डोळे झाकून लाखो रुपये टोरेस कंपनीत गुंतवले होते. अवघ्या काही दिवसांमध्ये व्याजासह संपूर्ण रक्कम परत मिळेल, यामुळे गुंतवणुकदार निश्चिंत होते. मात्र, गेल्या आठवड्यात टोरेस कंपनीने आपला गाशा गुंडाळला होता. 8 जानेवारीपर्यंत तुमचे पैसे परत मिळतील, असे गुंतवणुकदारांना सांगण्यात आले. मात्र, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर दादरमधील टोरेस कंपनीच्या कार्यालयाबाहेर गुंतवणुकदारांची प्रचंड गर्दी झाली होती. संतप्त गुंतवणुकदारांनी टोरेस कंपनीच्या मुंबईतील तीन कार्यालयांची तोडफोड केली. दादरमधील कार्यालयाबाहेर पोलिसांकडून दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले आहे.
आणखी वाचा
अधिक पाहा..