ऑस्ट्रेलियाने दहा वर्षानंतर बॉर्डर गावस्कर कसोटी मालिका आपल्या नावावर केली आहे. भारताला पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 3-1 ने पराभूत केलं. असं असताना या मालिकेत दोन्ही बाजूने खेळाडूंना डिवचण्याचा प्रकार घडला. विराट कोहलीने आपल्या फलंदाजीने भारतीय क्रीडाप्रेमींना नाराज केलं. पण आपल्या आक्रमक शैलीने ऑस्ट्रेलियन चाहत्यांना उत्तर देण्यास मागेपुढे काहीच पाहिलं नाही. या मालिकेत यामुळे विराट कोहली चर्चेत राहिला. ऑस्ट्रेलियाचा तरूण फलंदाज सॅम कोनस्टास खांद्याने मारलेला धक्का कोणीच विसरू शकत नाही. तर कधी ऑस्ट्रेलियन क्रीडाप्रेमींना सँडपेपर दाखवत डिवचलं. या सर्व प्रकारावर माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ऑस्ट्रेलियन क्रीडाप्रेमी हूटिंग करत असताना विराट कोहलीने इशाऱ्यातच सँडपेपरची आठवण करून दिली. त्याने रिकामी खिशात हात घालून सँडपेपर नसल्याचं दाखवलं. पण विराटच्या या कृतीमुळे टीम इंडियाचं नुकसान झाल्याचं मत सुनील गावस्कर यांनी नोंदवलं आहे.
सुनील गावस्कर यांनी सिडनी हेराल्डमध्ये लिहिलं की, ‘विराट कोहलीला हे समजलं पाहीजे की, प्रेक्षकांसोबत जे काही करतो त्यामुळे संपूर्ण संघावर दबाव येतो. प्रेक्षकांच्या निशाण्यावर येतात.’ एक दिग्गज आणि वरिष्ठ खेळाडू असातना असं करणं काही योग्य नसल्याचं मतही सुनील गावस्कर यांनी मांडलं. गावस्कर यांनी पुढे लिहिलं की, ‘कोहलीने खांदा मारला हे क्रिकेट नाही. भारतीय खेळाडू डिवचलं की उत्तर देतात. पण कोनस्टास प्रकरणात असं काहीच नव्हतं. खेळाडूंना काही वेळ गेल्यानंतर कळतं की प्रेक्षकांसोबत वाद घालून काहीच उपयोग नाही. प्रेक्षक सामन्यात आपला चांगला वेळ व्यतित करण्यासाठी आले आहे. ते वैयक्तिक कारणास्तव खेळाडूंना डिवचत नाही. ते त्यांचं मनोरंजन करण्याचा प्रकार असतो. यावर व्यक्त होण्यात काहीच अर्थ नाही. उलट नुकसान होतं.’
‘विराट कोहली वारंवार फेल होत असल्याने ऑफ स्टंपजवळील चेंडू खेळण्यास चाचपडत होता. तो टीममध्ये योगदान देऊ शकला असता. रोहित शर्माच्या फलंदाजीत काहीच खोली नव्हती आणि आपल्या फॉर्मच्या कारणास्तव संघात न खेळण्याचा धाडसी निर्णय घेतला. पण त्याने आता कसोटी क्रिकेटच्या भविष्याबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.’, असंही सुनील गावस्कर यांनी सांगितलं.