Tiger Death : पट्टेरी वाघ आढळला मृतावस्थेत; १३ नखे, २ दात गायब, उकणी कोळसा खाण परिसरातील घटना
Saam TV January 08, 2025 08:45 PM

संजय राठोड

यवतमाळ : यवतमाळच्या वणी तालुक्यातील उकणी कोळसा खाणी परिसरात कमला जाणाऱ्यांना अनेकदा वाघाचे दर्शन घडले होते. दरम्यान आज सकाळी सात वाजताच्या दरम्यान पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळुन आला. कोळसा खाणीत कामावर जाणाऱ्या कामगारांना मृत वाघ दिसताच कामगारांनी याबाबत वन विभागाला माहिती दिली असून पंचनामा करण्यात येत आहे. दरम्यान वाघाची नखे व दात गायब असल्याचे दिसून आले आहे.

जिल्ह्यातील उकणी खदाणीत पहिल्या पाळीत काम करणारे कामगार सकाळी कामाला जाण्यासाठी निघाले होते. यावेळी या कामगारांना मृत अवस्थेत पडलेला वाघ नजरेस पडला. ही वार्ता परिसरात पसरल्याने बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. मृत हा तीन ते चार वर्षाचा असावा असे बोलले जात असुन त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला. याचा तपास वन विभाग करत आहे. याची तपासणी केल्यानंतरच मृत्यूचे कारण समोर येणार आहे.  

वाघाची नखे व दात गायब

मृत वाघ हा याच परिसरात भ्रमण करत असावा असे बोलल्या जात आहे. दरम्यान दोन महिन्या पुर्वी कोळसा खाणीत काम करणाऱ्या काही कामगारांना या परिसरात वाघाचे दर्शन सुध्दा झाले होते. यानंतर अचानक हा वाघ मृतावस्थेत आढळून आला आहे. वाघाचा मृत्यू विजेचा शॉक लागून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. वाघाचा मृत्यू हा दहा दिवसा पुर्वी झाला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. कारण त्याचे शव पुर्णतः कुजलेल्या अवस्थेत असून त्याची दुर्गंधी देखील येत आहे. वाघाची नखे १३ नखे व २ दात गायब असल्याचे दिसून आले आहे

वन विभागाकडून पंचनामा 

दरम्यान वाघ मृतावस्थेत आढळून आल्याची माहिती वन विभागाला देण्यात आल्यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृत वाघाला मंदर येथे आणण्यात आले असुन त्याचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. वाघाचा मृत्यू नेमका कशाने झाला हे उत्तरीय तपासणी नंतरच स्पष्ट होणार आहे. दरम्यान गावातील नागरिकांनी देखील येथे गर्दी केली होती.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.