छत्रपती संभाजीनगर : मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध करुणा मुंडे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात निवडणूक याचिका सादर केली आहे. धनंजय मुंडे यांनी भ्रष्ट मार्गाने निवडणूक जिंकल्याचा व इतर आरोप त्यांनी केले आहेत. या निवडणूक याचिकेचा स्टॅम्प नंबर ५०९/२०२५ असल्याचे ॲड. चंद्रकांत ठोंबरे यांनी पत्रकात म्हटले आहे.
करुणा मुंडे यांनी परळी विधानसभा मतदारसंघातून आमदारकीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला होता. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज ३० ऑक्टोबर २०२४ रोजी फेटाळला होता. मात्र, धनंजय मुंडे आणि इतरांचे अर्ज मंजूर केले होते.
परळी विधानसभा मतदारसंघातून धनंजय मुंडे निवडून आल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी २३ नोव्हेंबर २०२४ रोजी घोषित केले होते. त्यानंतर करुणा मुंडे यांनी ४ जानेवारी २०२५ रोजी खंडपीठात निवडणूक याचिका सादर केली आहे.
माहिती दडवल्याचा आरोपआपण स्वतः १९९६ मध्ये कायदेशीर लग्न झालेली पत्नी असताना धनंजय मुंडे यांनी दोन अपत्यांचा उल्लेख केला. मात्र, पहिल्या पत्नीच्या नावावरील मालमत्ता आणि कोर्टातील प्रलंबित प्रकरणांची माहिती दडवली. मतदान प्रक्रिया सुरू असताना मतदान केंद्र ताब्यात घेतले. बऱ्याच मतदान केंद्रांवर सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही लावू दिले नाहीत.
राष्ट्रवादीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांना मतदान केंद्रावर प्रवेश करू दिला नाही. त्यांना मारहाण करून धमक्या दिल्या. तसेच, ॲड. माधवराव जाधव यांना मारहाण केली. भ्रष्ट मार्गाने निवडणूक जिंकली, असे आरोप याचिकेत केले आहेत. करुणा मुंडे यांच्यातर्फे ॲड. चंद्रकांत ठोंबरे काम पाहत आहेत.