MahaKumbh 2025: महा कुंभमेळ्यात अदानी कमवणार पुण्य! दररोज 1 लाख भाविकांचा मिळणार आशीर्वाद
esakal January 09, 2025 08:45 PM

Adani Group MahaKumbh 2025: महाकुंभ मेळ्याचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले आहे. पौष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून महा कुंभमेळा सुरू होईल. भारतातील चार तीर्थक्षेत्रे आणि पवित्र नद्यांवर महाकुंभ मेळा आयोजित केला जातो. महाकुंभ मेळा प्रामुख्याने 4 तीर्थक्षेत्रे, उज्जैनमधील शिप्रा नदी, प्रयागराज संगम, गंगा नदी हरिद्वार, गोदावरी नदी नाशिक येथे आयोजित केला जातो.

महा स्नानासाठी व दर्शनासाठी मोठ्या संख्येने लोक येतात. हा महाकुंभ मेळा सुमारे 45 दिवस चालतो. या मेळ्यात वेद, चरक संहिता, पुराण आणि प्राचीन ज्योतिषशास्त्राचे ग्रंथ प्रदर्शित केले जाणार आहेत. यंदा प्रयागराज शहरात महाकुंभ मेळा पाहायला मिळणार आहे.

या महा कुंभमेळ्यासाठी अदानी ग्रुपने इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शसनेस (इस्कॉन) सोबत भागीदारी करून उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात महाप्रसाद सेवा सुरू केली आहे. या महाप्रसाद सेवेद्वारे दररोज सुमारे 1 लाख भाविकांना जेवण दिले जाईल, यामध्ये 18,000 स्वच्छता कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहे.

सेवेसाठी सुमारे 2,500 स्वयंसेवक दोन मोठ्या स्वयंपाकगृहांमध्ये जेवण तयार करतील. या जेवणाचे आयोजन 40 केंद्रांवर केले जाणार आहे. भाविकांना हे जेवण पानांपासून बनवलेल्या पर्यावरणपूरक ताटांमध्ये दिले जाईल. महाप्रसादामध्ये रोटी, डाळ, भात, भाजी आणि गोड पदार्थांचा समावेश असेल.

अदानी ग्रुपची गीता प्रेसला मदत

याशिवाय, अदानी ग्रुपने गोरखपूर येथे मुख्यालय असलेल्या गीता प्रेससोबत भागीदारी करून आरती संग्रहाच्या 1 कोटी प्रती छापण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. आरती संग्रहात विविध देवतांची भजने किंवा आरतींचा संग्रह असणार आहे, ज्यामध्ये शिव, लक्ष्मी, गणेश, विष्णू, दुर्गा आणि इतर देवतांचा समावेश आहे. हा आरती संग्रह महा कुंभमेळ्यात भाविकांना विनामूल्य वाटला जाणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.