पुणे - ‘महाराष्ट्र पुढील पाच वर्षांत सर्व क्षेत्रांमध्ये पुढे असेल, देशाचे ‘ग्रोथ इंजिन’ म्हणून राज्याची ओळख निर्माण झालेली असेल. या परिवर्तनाच्या काळामध्ये सर्वसामान्य माणसांचे स्वप्न पुढील पाच वर्षांमध्ये पूर्ण होईल,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला आश्वस्त केले.
‘मी दिलेली आश्वासने या पाच वर्षांमध्ये पूर्ण झालेली तुम्हाला दिसतील. महाराष्ट्र ‘वन ट्रिलियन इकॉनॉमी’ असेल, महाराष्ट्राला आता कोणीही थांबवू शकणार नाही,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
‘सकाळ’ आणि ‘पुणे पब्लिक पॉलिसी फेस्टिवल’ यांच्यातर्फे आयोजित ‘व्हीजन महाराष्ट्राचे’ या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ‘सकाळ’चे संपादक सम्राट फडणीस यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची मुलाखत घेऊन पुढील पाच वर्षांत महाराष्ट्राच्या विकासाची दिशा कशी असेल, याबाबत त्यांना बोलते केले. याप्रसंगी शिक्षण, उद्योग, आरोग्य, व्यापार, बांधकाम, वित्त यासह विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ, अभ्यासक, प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
उद्योगक्षेत्रातील महाराष्ट्राचे स्थान, सद्यःस्थिती आणि भविष्यातील गुंतवणूक या विषयावर सविस्तर भूमिका फडणवीस यांनी मांडली. ‘पायाभूत सुविधा, शैक्षणिक धोरण, रोजगार निर्मिती, शेती, सिंचन आणि सांस्कृतिक वारसा या क्षेत्रात होऊ घातलेल्या आगामी बदलांबाबत आणि त्यासाठी आखण्यात आलेल्या धोरणांच्या जोरावर २०२९-२०३० मध्ये ‘थ्री ट्रिलियन’ अर्थव्यवस्थेची उद्दिष्ट नक्की गाठू शकतो, तेवढी क्षमता महाराष्ट्रात आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून प्रशासनाला गतिमान करणे आणि पारदर्शकपणे कारभार करण्यावर भर असणार आहे,’ असे फडणवीस यांनी सांगितले.
उद्दिष्ट १०० दिवसांचे
‘राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर शंभर दिवसांचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. यामध्ये प्रशासनाने त्यांचे सादरीकरण करून ते काय करणार हे मांडले आहे. तसेच नागरिकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी सात कलमी कार्यक्रम देखील मांडलेला आहे. या शंभर दिवसांच्या उद्दिष्टांवर राज्य सरकारच्या पुढील पाच वर्षांच्या कामाची दिशा स्पष्ट होणार आहे.
महाराष्ट्रातील प्रशासकीय घडी ही चांगली आहे, फक्त त्यांच्याकडून काम करून घेणाऱ्या नेतृत्वाची गरज आहे. प्रशासनाकडून कसे काम करून घ्यायचे हे गेल्या दहा वर्षात नरेंद्र मोदी यांनी दाखवून दिले आहे आहे. दिल्लीत आता ठग आणि दलाल सापडत नाहीत. प्रशासन लवकर नवीन बदल स्वीकारत नाही ते त्यांच्याकडे बदल करून घ्यावे लागतात,’ असे देखील फडणवीस यांनी सांगितले.
विकासाला गती
‘२०१४ ते २०२४ या दहा वर्षांच्या काळामध्ये माझ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. मी कधी मंत्रीही झालो नसताना थेट मुख्यमंत्री झाल्याने हा काही करू शकेल की नाही या विचाराने २०१४ ला लोक संशयाने बघायचे. पाच वर्षांचा पूर्ण कार्यकाळानंतर मी आता पुन्हा मुख्यमंत्री झालो आहे. मी काय करू शकतो किंवा माझी क्षमता काय ते लोकांनी अनुभवले आहे.
एक व्यक्ती म्हणूनही अनेक आव्हानांचा सामना केला आहे की त्यातून आता परिपक्वता आली आहे. आता मला आव्हानांची चिंता वाटत नाही किंवा मल्टिटास्किंग म्हणतो तशी आव्हानं पेलत असताना, आपला अजेंडा ढळू द्यायचा नाही. आपल्या अजेंड्यावर आपण चालत राहायचं असा माझा प्रयत्न असणार आहे.
मागच्या दहा वर्षांत २०१९ हे वर्ष आलं नसतं तर महाराष्ट्र वेगाने पुढे गेला असता. २०१९ ते २०२२ या कालावधीत विकासाला खीळ बसली होती. २०२२ नंतर आपण पुन्हा विकासाला गती दिली आहे. आता महाराष्ट्राला कुणी थांबवू शकणार नाही, असे मी खात्रीने सांगतो.’
युवाशक्तीचा उपयोग करणार
देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘महाराष्ट्रात युवाशक्ती मोठी आहे, त्यांचा उपयोग करून घेत आहोत, त्यांच्या शक्तीचा उपयोग केला तर राज्याची प्रगती दहापटींनी अधिक होऊ शकते. महाराष्ट्र कायम गुंतवणुकीमध्ये क्रमांक एकवरच आहे. गेल्या वर्षी जेवढी परकीय गुंतवणूक झाली होती, त्याचा ९० टक्के गुंतवणूक गेल्या सहा महिन्यांत झाली आहे.
पायाभूत सुविधांचा विकास समृद्धी महामार्गामुळे मुंबई, पुण्यासह आता छत्रपती संभाजीनगर, जालना, गडचिरोली, अमरावती येथे देखील गुंतवणूक होत आहे. या महामार्गाचा फायदा स्थानिकांना देखील मोठ्या प्रमाणात झाला आहे.’