Mission 100 Days Nanded : नांदेड जिल्ह्यातही 'मिशन १०० डे'साठी यंत्रणा सज्ज; सातकलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू
esakal January 10, 2025 02:45 PM

नांदेड : जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या सात कलमी कार्यक्रमाच्या ‘मिशन १०० डे’ अंमलबजावणीसाठी जिल्ह्यातील यंत्रणा कार्यान्वित केली आहे. या उपक्रमांतर्गत शंभर दिवसांत नागरिकांच्या सोयीसुविधा, प्रशासनातील सुधारणा आणि गुंतवणूक प्रोत्साहन यावर भर दिला जाणार आहे.

यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व विभागप्रमुखांना प्रमुख मुद्द्यांवर काम करण्याबाबतचे निर्देश दिले आहेत.मुख्यमंत्री डणवीस यांच्यासोबत मंगळवारी जानेवारी रोजी आयोजित व्हिडिओ कॉन्फरन्सिंगनंतर जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुखांना जिल्हाधिकारी राऊत यांनी लेखी आदेश दिले आहेत. यात प्रामुख्याने खालील सात सूत्रांचा वापर करण्यात आला आहे.

सदर कार्यक्रम १५ एप्रिल २०२५ पर्यंत राबविण्यात येणार असून, अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. कार्यक्रमाच्या कलमांतर्गत, कार्यालयाचे संकेतस्थळ अद्यावत करून नागरिकांना सेवा आणि माहिती सहज उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. संकेतस्थळाच्या सायबर सुरक्षा उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

पिण्याचे पाणी, स्वच्छ प्रसाधनगृह उपलब्ध करा

नागरिकांसाठी पिण्याचे पाणी, स्वच्छ प्रसाधनगृह यांसारख्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचे आणि प्रलंबित कामांची संख्या शून्यावर आणण्याच्या सूचना करण्यात आले आहे. तसेच गुंतवणूक वाढीसाठी प्रोत्साहन देणे आणि अधिकाऱ्यांनी जिल्ह्याच्या अगट भेटी देऊन अमलबाजवणीवर लक्ष द्यावे. याशिवाय, प्रत्येक विभाग प्रमुखाने आठवड्यातील दोन दिवस महत्वाकांक्षी प्रकल्प व ध्वजांकित योजनांचा आढावा घ्यावा, अशी सूचनाही दिली आहे. महत्वाकांक्षी योजनांच्या अंमलबजावणीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सातत्याने पाठपुरावा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

नावीन्यपूर्ण उपक्रम राबवा

नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर करण्यासाठी कार्यालयीन कामकाज पद्धतीत किमान दोन सुधारणा व नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याची सूचना दिली आहे. याशिवाय, स्वच्छता मोहिम राबवून अनावश्यक कागदपत्रे, खराब वाहने व उपकरणे निर्लेखित करण्याचे निर्देश दिले आहेत. तक्रारींच्या निवारणासाठी प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्याचे आणि विभागप्रमुखांनी आपल्या कार्यालयाच्या दर्शनी भागात नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवांचा तपशील लावण्याचे आदेश आहेत. उद्योजकांना त्रास होणार नाही याची दक्षता घेण्यावर विशेष सूचना करण्यात आली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.