नागपूर : पेंटिंगची कामे आटोपून घराकडे परत येत असलेले सासरे आणि बहिण जावई यांच्या दुचाकीला टिप्परने धडक दिल्याने गंभीर जखमी होऊन दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना चिखली पुलावर बुधवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
याप्रकरणी रोशन कृष्णाजी आदमने (वय ३१,रा. महाजनपुरा, भंडारा रोड, पारडी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी ट्रकचालकावर गुन्हा दाखल करीत अटक केली. गुलाब तुकाराम भजनकर (वय ५३, रा. इंदिरामाता नगर, बिनाकी ले-आउट, कांजी हाउस चौक) आणि महादेव विठोबा सहारे (वय ४५, रा. अडंम, ता. कुही) अशी मृतांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही पेंटिंगची काम करतात. दुपारच्या सुमारास त्यांनी आपल्या साईटवरची कामे संपवून दुचाकीवर (एम.एच.४० ए.बी. १७०५) कळमन्यातून यशोधरानगरकडे चिखली उड्डाणपुलावरून येत असताना, आर.टी.ओ. कार्यालयासमोर टिप्पर (एम.एच.४० बी.एल. ४३०१) चालकाने त्यांना धडक दिली. त्यामुळे त्यांची दुचाकी टिप्परखाली आल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
यावेळी चालक कुलेश्वर तुलसीराम निसार (वय ४२, रा. नवेगाव, ता. पारशिवनी) हा घटनास्थळावरून फरार झाला. याबाबत नागरिकांनी सूचना दिल्यावर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेयो रुग्णालयात पाठविले.
याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक गव्हाने यांनी चालकावर गुन्हा दाखल करीत, त्याला अटक केली. पोलिस प्रकरणाचा तपास करीत आहेत.