बीडमध्ये पोलीस मुख्यालयातच पोलिसाने संपवलं जीवन, धक्कादायक घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ
esakal January 08, 2025 08:45 PM

Beed Police Suicide: संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे सध्या राज्यभरात बीड जिल्हा चर्चेत आहे. यावरून राजकीय वातावरणही तापलं आहे. असं असतानाच आता जिल्हा पोलीस मुख्यालयातच पोलिसाने आत्महत्या केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. आज पहाटे हा प्रकार उघडकीस आला आहे.

पोलीस मुख्यालयातच आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव अनंत इंगळे असं आहे. त्यांच्या आत्महत्येचं नेमकं कारण समोर आलं नाही. त्यांची पोलीस मुख्यालयात ड्युटी होती. पहाटेच्या वेळी त्यांनी गळफास घेत जीवन संपवलं.

अनंत इंगळे यांनी गळफास घेत आत्महत्या केल्याची माहिती त्यांच्या नातेवाईखांना देण्यात आली. पोलीसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून मृत्यूची नोंद करण्यात आलीय. पोलीस कर्मचाऱ्यानेच मुख्यालयात केलेल्या या आत्महत्येनं बीडमध्ये खळबळ उडाली आहे.

बीड शहरातील पोलीस मुख्यालयावर कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याने, मुख्यालयाच्या भिंतीलगत आवळ्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केलीय. नातेवाईक आल्यानंतर मृतदेह उतरवण्यात येणार असल्याची माहिती समजते. आज सकाळी ही घटना उघडकीस आली असून अद्याप मृतदेह झाडालाच लटकलेला आहे.अनंत मारोती इंगळे रा. कळंमआंबा ता.केज जि बीड असे आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.