बॉर्डर गावसकर ट्रॉफी 2024-2025 नंतर अंतिम सामन्यासाठी दुसरा संघ निश्चित झाला. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला पाचव्या आणि अंतिम सामन्यात पराभूत केलं. ऑस्ट्रेलियाने या विजयासह डबल धमाका केला. ऑस्ट्रेलियाने 10 वर्षांनंतर बॉर्डर गावसकर ट्रॉफी जिंकली. तसेच सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्शीप फायनलमध्ये धडक मारली.आता जून 2025 मध्ये दक्षिण आफ्रिका टेस्ट वर्ल्ड कप ट्रॉफीसाठी गतविजेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध भिडणार आहे. या दरम्यान क्रिकेट चाहत्यांना अनेक एकदिवसीय आणि टी 20i मालिकेचा थरार अनुभवायला मिळणार आहे. मात्र क्रिकेट चाहत्यांचं लक्ष हे द्विपक्षीय मालिकांपेक्षा आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेकडे लागून आहे.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत एकूण 8 संघांमध्ये 15 सामने खेळवण्यात येणार आहेत. एक आशियाई संघ या स्पर्धेत पहिल्यांदाच खेळणार आहे. आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेतील कामगिरीच्या जोरावर अव्वल 7 संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र ठरले. तर पाकिस्तान यजमान असल्याने त्यांना थेट एन्ट्री मिळाली. हा नवा संघ कोणता? त्यांची गत टी 20 आणि वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील कामगिरी कशी राहिलीय? हे आपण जाणून घेऊयात.
अफगाणिस्तान क्रिकेट टीमची चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत खेळण्याची यंदाची पहिलीच वेळ ठरणार आहे. अफगाणिस्तानची गेल्या काही वर्षांमध्ये तिन्ही फॉर्मेटमध्ये कामगिरीचा आलेख चढता राहिला आहे. अफगाणिस्तानने अनेक दिग्गज संघांना पराभूत करत साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.
अफगाणिस्तानने वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेतील साखळी फेरीतील एकूण 9 पैकी 4 सामने जिंकले. अफगाणिस्तानने इंग्लंड, पाकिस्तान, श्रीलंका आणि नेदरलँड्सला पराभूत केलं होतं. अफगाणिस्तान या 4 विजयांसह पॉइंट्स टेबलमध्ये सहाव्या स्थानी राहिली आणि चॅम्पिन्स ट्रॉफीसाठी पात्र ठरली.
तसेच अफगाणिस्तानने टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत धडक मारली होती. अफगाणिस्तानने साखळी फेरीतील 4 पैकी 3 सामने जिंकले होते. अफगाणिस्तानने युगांडा, न्यूझीलंड आणि पीएनजीला पराभूत केलं होतं. तर सुपर 8 मधील 3 पैकी 2 सामन्यात प्रतिस्पर्ध्यांचा धुव्वा उडवला होता. अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेशला पराभवाची धुळ चारली होती. अफगाणिस्तानने यासह उपांत्य फेरीत धडक मारलेली. मात्र दक्षिण आफ्रिकेने उपांत्य फेरीत विजय मिळवला आणि अफगाणिस्तानचा प्रवास तिथेच संपला.
अफगाणिस्तानला अंतिम फेरीत पोहचता आलं नाही, मात्र त्यांनी अनेक संघांचं टेन्शन वाढवलं आणि क्रिकेट विश्वाला त्यांची दखल घेण्यास भाग पाडलं. आता चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी अफगाणिस्तान बी ग्रुपमध्ये आहे. अफगाणिस्तानसोबत ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडचा समावेश आहे. अफगाणिस्तानमुळे या तिन्ही संघांना धाकधुक असेल, यात क्रिकेट चाहत्यांना काडीमात्र शंका असण्याचा प्रश्नच नाही. त्यामुळे अफगाणिस्तानच्या कामगिरीकडे साऱ्यांचंच लक्ष असेल.
विरुद्ध दक्षिण आफ्रिका, शुक्रवार 21 फेब्रुवारी, कराची
विरुद्ध इंग्लंड, बुधवार 26 फेब्रुवारी, लाहोर
विरुद्ध ऑस्ट्रेलिया, शुक्रवार 28 फेब्रुवारी, लाहोर