पुणे: एका बहुराष्ट्रीय आयटी कंपनीतील तरुणीवर तिच्या सहकाऱ्यानेच धारदार हत्याराने वार केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (ता. ७) सायंकाळी येरवडा परिसरात घडली. या हल्ल्यात ही तरुणी गंभीर जखमी झाली आहे. येरवडा पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
शुभदा शंकर कोदारे (वय २८, रा. बालाजी नगर, कात्रज) असे जखमी झालेल्या तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी कृष्णा सत्यनारायण कनोजा (वय ३०, रा. खैरेवाडी, शिवाजीनगर, पुणे) या संशयिताला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही तरुणी मूळची कराड येथील आहे. ती येरवडा परिसरातील रामवाडी येथील एका बहुराष्ट्रीय आयटी कंपनीतील कॉल सेंटरमध्ये कामास आहे.
तिचा याच कंपनीतील सहकारी कृष्णा कनोजा याच्यासमवेत काही कारणावरून वाद झाला होता. ती मंगळवारी सायंकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास कंपनीच्या पार्किंगमध्ये आली होती. त्यावेळी कनोजाने तिला पार्किंगमध्ये गाठले. त्याने तरुणीच्या उजव्या कोपऱ्यावर धारदार हत्याराने वार केले. त्यात मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्याने तरुणी गंभीर जखमी झाली आहे. तिला येरवड्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
हल्ल्याचे कारण अद्याप अस्पष्टशुभदा आणि कृष्णा हे दोघे कंपनीच्या कॉल सेंटरमध्ये अकाउंटंट म्हणून काम करतात. त्यांच्यात पैशांच्या कारणावरून वाद झाल्याची प्राथमिक माहिती आहे. यातूनच त्याने हे कृत्य केले असावे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. हल्ल्याचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील यांनी दिली.