मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार ) आणि शिवसेनेचे ( ठाकरे गट ) आमदार, खासदार फोडण्याचे प्रयत्न शिंदे गट आणि अजितदादा पवार यांच्याकडून सुरू आहेत. पण, यावरून शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत हे भाजपवर भडकले आहेत. अख्खा देशात मरेपर्यंत तुम्ही हेच करणार आहात का? असा संतप्त सवाल राऊत यांनी भाजपला विचारला आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील 7 खासदारांना अजितदादांच्या पक्षात येण्याची ऑफर खासदार सुनील तटकरे यांनी दिली आहे. तसेच, ठाकरेंच्या शिवसेनेतील आमदार, खासदारांना शिंदे गटातून संपर्क साधण्याचा प्रयत्न होत आहे. याच प्रकरणावरून राऊत यांनी भाजपवर संतापत व्यक्त केला.
– Advertisement –
हेही वाचा : पवारांचे खासदार अजितदादांकडून फोडण्याचे प्रयत्न; संजय राऊत संतापत म्हणाले, “हा नीच अन्…”
संजय राऊत म्हणाले, “किती आमदार-खासदार शिंदे गटाच्या संपर्कात आहेत, यांची नावे त्यांनी जाहीर करावी. आमचाही त्यांच्या गटाशी संपर्क आहे, असं मी बोललो तर? पण, मी बोलणार नाही. आज त्यांच्याकडे सत्ता आहे. दिल्लीत राक्षस बसलेले आहेत. त्यांच्याकडे ईडी, सीबीआय आणि पैसा आहे. त्या भीतीपोटी ही फोडाफोडी सुरू आहे.”
– Advertisement –
“शेवटी भाजपला किती आमदार, खासदार पाहिजे? त्यांचे भविष्य काय? जे सोडून जात आहेत, त्यांच्या तोंडावर हाडकेच पडणार आहेत. यात महाराष्ट्राचा स्वाभिमान, अभिमान याचा काही संबंध येतो का? आमचे आणि शरद पवारांचे आमदार, खासदार फोडण्याचे प्रयत्न होत आहेत. यात नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांचा मुखवटा गळून पडत आहे. अख्खा देशात मरेपर्यंत तुम्ही हेच करणार आहात का? राजकारणातून तुमच्या सुद्धा तिरड्या कधीतरी उचलल्या जाणार आहेत. तेव्हा तुम्ही काय करणार आहात? देशाच्या इतिहासात तुमची नोंद अत्यंत वाईट शब्दांत होणार आहे. देशाची, लोकशाही आणि महाराष्ट्राची वाट लावणारे लोक म्हणून तुमचा इतिहास लिहिला जाईल,” अशी टीका राऊतांनी केली आहे.
हेही वाचा : शरद पवारांच्या 7 खासदारांना तटकरेंकडून अजितदादांकडे येण्याची ऑफर? सुळेंचा पटेलांना फोन अन्…