उरुळी कांचन - क्लास संपल्यानंतर घराकडे जाणाऱ्या शाळकरी मुलीला अडवून तिचा विनयभंग केल्याची घटना लोणी काळभोरमध्ये घडली. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे.
युवराज सोमनाथ सोनवणे, (वय-२५, रा. धुमाळ मळा, लोणी काळभोर) असे पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. यासंदर्भात लोणी काळभोर पोलिस ठाण्यात पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे.
लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी क्लास संपल्यानंतर रविवारी (ता.५) सायंकाळी सहाच्या सुमारास घराकडे जात होती. त्यावेळी युवराज सोनवणे हा तिच्या जवळ आला. त्याने पीडितेचा हात धरून 'चल आपण पळून जाऊ', असे म्हणत तिचा विनयभंग केला.
पीडितेने ही घटना तिच्या आईला सांगितल्यानंतर तिच्या आईने युवराज सोनवणे याला जाब विचारला, त्यावेळी त्याने पीडितेच्या आईलाही शिवीगाळ करून मारहाण केली. त्यानंतर पीडितेच्या आईने सोनवणे याच्याविरोधात पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार लोणी काळभोर पोलिसांनी युवराज सोनवणे याच्यावर गुन्हा दाखल केला. पोलिस उपनिरीक्षक पूजा माळी अधिक तपास करीत आहेत.