एकनाथ शिंदेंकडून पश्चिम महाराष्ट्रात उद्धव ठाकरे गट, शरद पवार गटाला मोठा धक्का
GH News January 08, 2025 10:08 AM

विधानसभा निवडणूक निकालानंतर महायुतीमधील तिन्ही पक्ष बळकट होत चालले आहेत. त्याचवेळी दुसऱ्याबाजूला महाविकास आघाडीमधील शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटातून आऊटगोईंग मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटाला आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते सोडचिठ्ठी देऊन सत्ताधारी पक्षांमध्ये दाखल होत आहेत. महायुतीकडे पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा हा ओघ असाच सुरु राहिला, तर आगामी काळात या दोन्ही गटांच राजकीय दृष्ट्या अजून मोठ नुकसान होईल. पुढच्या काही महिन्यात महानगर पालिका, नगर पालिका, जिल्हा परिषद अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हा कुठल्याही पक्षाचा पाया असतो. कारण या निवडणुकीतून निवडून येणारे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, सरपंच, उपसरपंच हे थेट जनतेच्या संपर्कात असतात. यांच्यामधूनच पुढे आमदार, खासदार आणि मंत्री घडतात. त्यामुळे हे आऊटगोईंग असच सुरु राहिलं, तर शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मोठा फटका बसू शकतो. मोहोळ तालुक्यात ठाकरे गट आणि शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. माजी पंचायत समिती सदस्य, माजी उपसरपंच यांसह 30 जणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

कोणी घडवून आणला हा पक्ष प्रवेश?

मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पाडला. शिवसेना जिल्हाप्रमुख चरणराज चवरे यांनी हा पक्षप्रवेश घडवून आणला. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गट आणि शरद पवार गटाला मोठा धक्का मानला जातोय.

पुण्यातही उद्धव ठाकरे गटाला धक्का

पुण्यातही उद्धव ठाकरे गटाला धक्का बसला. पाच माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. नांदेडमध्ये सुद्धा असच झालं. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी अजितदादांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख माधव पवाडे आणि अविनाश घाटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.