वैमानिक प्रशिक्षण हे तर 'स्किल ट्रान्स्फर'!
esakal January 08, 2025 10:45 AM

- कॅप्टन नितीन वेलदे, वैमानिक प्रशिक्षक

मोठेपणी वैमानिक (पायलट) होऊन विमान उंच उडवायचं असं अनेकांचं स्वप्न असतं. त्यापैकी काहींना भारतीय वायूसेनेत भरती होण्यात यश येतं, तर काही विद्यार्थी प्रवासी वाहतूक करणाऱ्या विमानांचे वैमानिक होतात. विमान कोणतंही असलं, तरी त्याचा चालक या नात्याने सर्व जबाबदारी वैमानिकावर असते. त्याच्यावर कित्येक जणांचं जीवन अवलंबून असतं. त्यामुळे त्याच्यात दुर्दम्य आत्मविश्वास लागतो आणि अखंड सावधानताही.

वैमानिक होण्यासाठी कोणती प्राथमिक तयारी करावी?

भारतीय वायूसेनेत जाण्याचा स्वतंत्र मार्ग आहे. त्याशिवाय विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण झाल्यावर भारतातील ४० ठिकाणी असलेल्या ‘फ्लाइंग स्कूल’पैकी कोणत्याही ठिकाणी जाऊन तुम्ही तेथील प्रवेशपरीक्षा देऊ शकता. त्यानंतर ‘डीजीसीए’च्या नियमाप्रमाणे घेतल्या जाणाऱ्या लेखी परीक्षा तुम्हाला द्याव्या लागतात. त्यात उत्तीर्ण झाल्यावर सुमारे २०० तासांचं प्रशिक्षण विद्यार्थ्याला पूर्ण करावं लागतं. त्यात लेखी, प्रात्यक्षिक दोन्ही गोष्टींचा समावेश होतो.

हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्या संबंधित विद्यार्थ्याला ‘कमर्शिअल पायलट लायसन्स’ हा प्राथमिक स्तरावरचा परवाना मिळतो. त्याद्वारे तो विद्यार्थी इंडिगो, एअर इंडिया यांसारख्या कंपन्यांसाठी काम करू शकतो व करिअर घडवू शकतो. हेलिकॉप्टरसाठी आपल्याकडे एकच शैक्षणिक संस्था आहे. त्यामुळे त्यात थोड्या मर्यादा आहेत.

प्रशिक्षण कशा पद्धतीने दिलं जातं?

विद्यार्थ्यी व पालकांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, बाकी सर्व क्षेत्रांमध्ये आधी लेखी अभ्यासक्रम शिकवला जातो. कदाचित छोट्या स्वरूपाचं प्रात्यक्षिक होतं. मात्र, पायलटिंगमध्ये १० तासांची थेअरी विद्यार्थी शिकला, की त्याला विमानात बसवून प्रात्यक्षिक दिलं जातं. त्यामुळे पायलटिंगला आम्ही ‘स्किल ट्रान्स्फर’ असं म्हणतो. विद्यार्थी जे शिकला ते तो लगेच करून बघतो.

उत्कृष्ट वैमानिक होण्यासाठी कोणती कौशल्ये असावीत?

हवेत विमान घेऊन गेलेला वैमानिक त्या क्षणी एकटा असतो. त्यामुळे त्याच्यात प्रचंड धैर्य, आत्मविश्वास, स्वयंशिस्त असावी लागते. ‘एटीसी’च्या सूचनांकडे पूर्ण लक्ष असावं लागतं. ‘मी त्यांचं का ऐकू?’ असा ‘इगो’ मनात येता कामा नये. संवादकौशल्य, प्रतिसाद देण्याचा वेळ आणि ऐकून घेण्याची क्षमता खूप चांगली असावी लागते. आज माझ्या उड्डाणात काही चूक झाली का? याचं आत्मपरीक्षण त्याला करता यायला हवं. धोक्याची स्थिती निर्माण झाल्यास त्याने न डगमगता प्रसंगावधान दाखवायला हवं.

वैमानिक होताना...

  • तुमच्या ‘इन्स्ट्रक्टर’चा प्रत्येक शब्द काळजीपूर्वक ऐका. त्यात ‘शॉर्टकट्स’ शोधू नका.

  • ‘एटीसी’च्या सूचनांकडे दुर्लक्ष करू नका. त्या वेळी डोक्यात पदानुसार ज्येष्ठ-कनिष्ठ असा विचार आणू नका.

  • लेखी प्रश्नांची अचूक उत्तरे लिहिणं जितकं महत्त्वाचं असतं, तितकंच वैमानिकाच्या खुर्चीत बसल्यावर सर्व ‘सिस्टीम’ चालवता येणं हेही महत्त्वाचं असतं.

  • आपला प्रवास केवळ मजा, आनंद म्हणून नाही, तर प्रवाशांचं जीवन आपल्यावर अवलंबून आहे ही जाणीव सतत मनात ठेवा.

(शब्दांकन - मयूर भावे)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.