रवींद्र जडेजा, अक्षर पटेल की कुलदीप यादव! चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी गौतम गंभीर कोणाला देणार संधी?
GH News January 08, 2025 08:12 PM

रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न पाहिलं आहे. मागच्या पर्वात पाकिस्तानने भारताचा धुव्वा उडवत जेतेपदावर नाव कोरलं होतं. त्यामुळे यंदाचं जेतेपद मिळवून त्यावर मलम लावावा अशी क्रीडाप्रेमींची इच्छा आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी आता फक्त काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. भारताचे सर्व सामने दुबईत होणार आहेत. असं असताना भारताचा संघ अजूनही जाहीर केलेला नाही. मिळालेल्या माहितीनुसार, टीम इंडियाची निवड 12 जानेवारीला केली जाईल असं सांगण्यात येत आहे. असं असताना टीम इंडियात कोणत्या खेळाडूंना संधी मिळणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कारण दुबईतील खेळपट्टी ही फिरकीपटूंना मदत करणारी आहे. अशा स्थितीत प्लेइंग 11 मध्ये दोन फिरकीपटूंना संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे टीम इंडियात स्थान मिळवण्यासठी रवींद्र जडेजा, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांच्यात चुरस आहे. त्यामुळे कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक गौतम गंभीर कोणत्या खेळाडूंना संधी देतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दुबईतील खेळपट्टी ही धीमी आणि फिरकीला मदत करते. तसेच या खेळपट्टीवर झटपट धावा करणं खूपच कठीण आहे. रिपोर्टनुसार चॅम्पियन्स ट्रॉफीत भारतीय संघ हा वनडे आणि टी20 वर्ल्डकपच्या आधारावरच असण्याची शक्यता आहे. म्हणजेच, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांना संघात संधी मिळू शकते. तर प्लेइंग 11 मध्ये रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांना संधी मिळू शकते. कारण हे दोन्ही खेळाडू गोलंदाजीसोबत फलंदाजीतही चांगले आहेत. रवींद्र जडेजात सामना संपवण्याची ताकद आहे. तर अक्षर पटेलही मोक्याच्या क्षणी चांगली फलंदाजी करतो. टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत त्याने याची चुणूक दाखवली आहे.

कुलदीप यादवला संघात स्थान मिळेल की नाही हे सांगणं कठीण आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात बंगळुरुत त्याला दुखापत झाली होती. जर्मनीमध्ये त्याच्या ग्रोइनवर शस्त्रक्रिया झाली आणि सध्या तो बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये पुनरागमनासाठी प्रयत्न करत आहे. पण इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संधी मिळाली नाही तर त्याचं संघात असणं खूपच कठीण आहे. त्यामुळे कुलदीप यादव बरा झाला नाही तर रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांना संधी मिळणार हे जवळपास निश्चित आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.