पिंपरी, ता. ८ ः महाराष्ट्रामध्ये एचएमपीव्ही विषाणूंच्या संसर्गाची दोन प्रकरणे समोर आली आहेत, त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरामध्ये देखील आरोग्य यंत्रणा सज्ज करण्यात यावी, अशी मागणी माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना निवेदनाद्वारे केली आहे. ‘महाराष्ट्रातील नागपूर शहरात एचएमपीव्ही विषाणूंचा संसर्ग दोन लहान मुलांना झाला आहे. तर देशभरात आतापर्यंत या आजाराचे सात रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आपल्या देखील शहरामध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. २०२० मध्ये आलेल्या कोरोना महामारीच्या काळामध्ये शहरातील अनेक नागरिकांनी प्राण गमावले आहेत. याची पुनरावृत्ती पुन्हा होऊ नये म्हणून महापालिकेने वैद्यकीय आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवणे आवश्यक असल्याने संबंधित विभागांना त्वरित आदेश द्यावेत, अशी आग्रही मागणी वाघेरे यांनी निवेदनात केली आहे.