टीम इंडियाचा संकटमोचक आणि प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्या दुखारपतीमुळे रोहितसेनेचं टेन्शन वाढलं आहे. बुमराहला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्यात सिडनीमध्ये पाठीदुखीचा त्रास जाणवला. बुमराहला या दुखापतीमुळे मैदानाबाहेर जावं लागलं होतं. बुमराहच्या दुखापतीवर आवश्यक तपासणी करण्यात आली. त्यानंतर बुमराह सामन्यादरम्यान परतला. मात्र त्याला दुसऱ्या डावात बॉलिंग करता आली नाही. त्यानंतर आता टीम इंडियाची आणि साऱ्या क्रिकेट चाहत्यांचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे.
बुमराहला दुखापतीमुळे चॅम्पियन्स ट्रॉफीला मुकावं लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे. इतकंच नाही, तर बुमराहला दुखापतीमुळे 6 महिने दूर रहावं लागू शकतं, असंही म्हटलं जात आहे.
टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, अशाच प्रकारच्या दुखापतीमुळे त्रस्त असलेल्या क्रिकेटपटूंचं म्हणणं आहे की “जर हे पाठीतील पेटके असेल, तर बुमराहला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी दुखापतीतून पूर्णपणे फिट व्हायला हवं”. तसेच ग्रेड 1 स्ट्रेस फ्रॅक्चर असेल तर बुमराहला दुखापतीतून पूर्णपणे फिट होण्यासाठी वेळ लागू शकतो. तसं झालं तर बुमराहला अनेक स्पर्धांना मुकावं लागू शकतं. आता बुमराहला फार गंभीर स्वरुपाची दुखापत झालेली नसावी, अशीच आशा टीम मॅनेजमेंट आणि क्रिकेट चाहत्यांना आहे.
बुमराहच्या दुखापतीमुळे टीम इंडियाला टेन्शन!
दरम्यान बुमराहने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याच्या लौकीकाला साजेशी अशी कामगिरी केली. बुमराहने कर्णधार म्हणूनही स्वत:ला सिद्ध केलं. तसेच बुमराहने बॉलिंगसह निर्णायक क्षणी चिवट बॅटिंग केली. बुमराहने रोहितच्या अनुपस्थितीत पर्थमध्ये नेतृत्व केलं आणि टीम इंडियाला विजयी सलामी मिळवून दिली. तसेच बुमराहने 5 सामन्यांमध्ये सर्वाधिक 32 विकेट्स घेतल्या. तसेच बुमराहने तिसर्या सामन्यात आकाश दीपसोबत दहाव्या विकेटसाठी चिवट भागीदारी करत फॉलोऑन टाळला होता. बुमराहला त्याच्या या कामगिरीसाठी ‘मॅन ऑफ द सीरिज’ पुरस्काराने गौरवण्यात आलं.