थकव्यावर करू मात
esakal January 09, 2025 10:45 AM

आजच्या काळात बहुतांश लोकांची कामे बैठ्या स्वरूपाची झाली आहेत. तासन्तास स्क्रीनसमोर काम करणे, सततच्या मीटिंग्ज आणि मर्यादित शारीरिक हालचाली यामुळे शारीरिक थकवा, मानसिक कंटाळा आणि ऊर्जा कमी झाल्याची भावना अनेकांना जाणवते.

अलीकडेच मला एका विद्यार्थिनी वाटेत भेटली. बोलता बोलता म्हणाली, ‘सायलीताई, मी सतत ऑफिसमध्ये खुर्चीवर बसून काम करते. हल्ली खूप थकवा येतो. काही वेळा तर सकाळी उठतानाही कंटाळा येतो. दिवसभर हतबल वाटते. यावर काही उपाय आहेत का?’ मी विचारले, ‘तुझी दिनचर्या कशी असते?’ ती म्हणाली, ‘सकाळी ऑफिसला जाण्यासाठी धावपळ. दिवसभर बसून काम आणि संध्याकाळी पुन्हा थकल्यासारखे वाटते. वेळच नाही काही करण्यासाठी!’

ही समस्या फक्त तिची नाही. बैठ्या जीवनशैलीमुळे अनेक जण अशाच समस्यांना सामोरे जात आहेत. यासाठी मी तिला सांगितले, ‘काही सोप्या सवयी आणि व्यायाम प्रकार तुझ्या दिनक्रमात सामील केलेस, तर नक्कीच सुधारणा होईल. फक्त १०-१५ मिनिटे दररोज स्वतःसाठी काढ.’

थकवा कमी करण्यासाठी सोपे उपाय

1) डेस्क स्ट्रेचेस - खुर्चीत बसून काम करताना दर ३०-४५ मिनिटांनी पाठीचा कणा सरळ करून स्ट्रेच करा. मान डाव्या-उजव्या बाजूला वळवा, खांदे गोल फिरवा, आणि हातांची बोटे ताणून नंतर सोडा.

2) पर्वतासन - ऑफिसमध्येच किंवा घरी, जिथे जागा असेल तिथे डाऊनवर्ड ‘डॉग पोझ’ करा. यामुळे शरीराला ताण मिळतो आणि ऊर्जा वाढते.

3) सूर्यनमस्कार - घरी सकाळी फक्त पाच-सात सूर्यनमस्कार घातल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि शरीराला हलके आणि ताजेतवाने वाटते.

4) श्वसनक्रिया - खोल श्वास घ्या आणि हळूहळू सोडा. प्राणायाम (उदाहरणार्थ, अनुलोम-विलोम) करून मन शांत आणि शरीर ऊर्जावान ठेवा.

दिनचर्येमध्ये बदल

ब्रेक घ्या - सतत बसून राहिल्याने स्नायूंवर ताण येतो. दर ४५ मिनिटांनी उभे राहून थोडे पाय मोकळे करा.

संपूर्ण आहार - भरपूर पाणी प्या, आणि तुमच्या आहारात प्रथिने, फायबर, आणि पोषक तत्त्वे असलेले पदार्थ जोडा.

झोपेची काळजी घ्या - चांगली झोप घेतल्याने थकवा कमी होतो आणि मन शांत राहते.

ताणतणाव कमी करा - मेडिटेशन किंवा साधा पाच-दहा मिनिटांचा ताणमुक्ती व्यायाम करा.

मैत्रिणींनो, बैठ्या कामामुळे आलेला थकवा आणि कंटाळा टाळण्यासाठी हे उपाय सहज करता येण्याजोगे आहेत. हवी फक्त थोडी इच्छाशक्ती आणि नियमितता. तुमचे आयुष्य आनंदी आणि उर्जेने भरलेले राहो.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.