वृत्तसंस्था/ चेन्नई
तामिळनाडूत अण्णा विद्यापीठात विद्यार्थिनीवर झालेल्या बलात्कार प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले आहे. तामिळनाडू विधानसभेत देखील विरोधी पक्ष या प्रकरणावरून सरकारला लक्ष्य करत आहे. बुधवारी या मुद्द्यावर मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी विधानसभेत वक्तव्य करत विरोधी पक्ष या मुद्द्यावर राजकारण करत असल्याचा आरोप केला. आरोपी द्रमुकसमर्थक असला तरीही तो पक्षाचा कार्यकर्ता नव्हता, असा दावा स्टॅलिन यांनी केला आहे.
विधानसभेच्या सदस्यांनी विद्यापीठाच्या नावाचा उल्लेख केला. परंतु मी विद्यापीठाचे नाव घेत त्याची बदनामी करू इच्छित नाही. अशाप्रकारची घटना घडेल याचा विचारही कुणी नव्हता. विद्यार्थिनीसोबत जे घडले ते अत्यंत वाईट आणि निर्दयीपणाचे होते. सर्व सदस्यांवर यावर मतप्रदर्शन करत सरकारला वाईट ठरविण्याचा प्रयत्न केला. परंतु सरकार पीडितेसोबत खंबीरपणे उभे आहे. आरोपीला अटक करण्यात आली नसती तर सरकारवर आरोप करणे योग्य ठरले असते. परंतु आरोपीला घटनेनंतर त्वरित अटक करण्यात आली. अशा स्थितीत आता सरकारवर केवळ राजकीय लाभासाठी आरोप केले जात आहेत. आरोपी गणाशेखरन हा द्रमुकचा सदस्य नाही, तो केवळ पक्षाचा समर्थक असल्याचे स्टॅलिन यांनी म्हटले आहे.
काय आहे प्रकरण?
अण्णा विद्यापीठ परिसरात 23 डिसेंबर रोजी एका विद्यार्थिनीवर बलात्कार करण्यात आला होता. विद्यार्थिनी विद्यापीठ परिसरात मित्रासोबत बोलत असताना तेथे पोहोचलेल्या आरोपीने तिचे लैंगिक शोषण केले होते. पोलिसांनी संबंधित आरोपीला अटक केली आहे. 37 वर्षीय आरोपी विद्यापीठ परिसरानजीक बिर्याणी विकत होता. या बलात्कार प्रकरणावरून तामिळनाडूतील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. विधानसभा अधिवेशनादरम्यान विरोधी पक्षाने या मुद्द्यावरून जोरदार घोषणाबाजी केली आहे.