Dhas-Munde Supporters : धस-मुंडे यांचे समर्थक पाटोद्यात आमनेसामने पोलिस ठाण्यात तक्रारी देण्याचे निमित्त
esakal January 10, 2025 04:45 PM

पाटोदा : मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला एक महिना पूर्ण झाल्याच्या दिवशी पाटोदा शहरात पाटोदा पोलिस ठाण्यात बुधवारी निवेदन देण्याच्या निमित्ताने आमदार सुरेश धस, मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांचे समर्थक, तर त्यांच्या सोबतच दुसऱ्या बाजूने मंत्री धनंजय मुंडे व पंकजा मुंडे यांचे समर्थक एकाच वेळी पोलिस ठाण्यात जमले. यावेळी दोन्ही बाजूंच्या समर्थकांकडून घोषणाबाजी करण्यात आली.

आमदार धस व जरांगे यांच्याबद्दल बदनामीकारक पोस्टप्रकरणी गुन्हे नोंदवण्याची मागणी त्यांच्या समर्थकांनी केली व तशी तक्रार दिली. परभणी येथील सभेतील धस व जरांगे यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल धनंजय मुंडे व पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी तक्रार दिली.

त्यानुसार परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले. यामध्ये मनोज जरांगे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी, राष्ट्रवादी युवक आघाडीचे सूरज चव्हाण व अन्य काही जणांविरोधात अदाखलपत्र गुन्हे दाखल झाले आहेत.

धसांचे जमले अडीचशे समर्थक

आमदार सुरेश धस गटाचे दोनशे ते अडीचशे समर्थक आज सकाळी साडेदहापासूनच पाटोदा पोलिस ठाण्यात निवेदन देण्यासाठी जमले. त्याचवेळी दुसरीकडून धनंजय मुंडे व पंकजा मुंडे यांचे समर्थकही तेवढ्याच संख्येने एकत्र आले. सुरवातीला आमदार धस गटाकडून नगराध्यक्ष राजू जाधव यांनी तक्रार दिली.

त्यात अमोल मिटकरी व सूरज चव्हाण यांनी समाज माध्यमांवर आमदार धस यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह व बदनामीकारक वक्तव्य केले, सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला, मनोज जरांगे यांच्याबद्दलही पोस्ट करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले. त्यानुसार अमोल मिटकरी, सूरज चव्हाण, कांचन नामदेव केंद्रे, बालाजी दहिफळे, राम माने, सुनील थोरवे, अजिंक्य गर्जे, संदीप केंद्रे, करण नागरगोजे, सचिन नागरगोजे यांच्या विरोधात अदाखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.

मुंडे समर्थकांची तक्रार

मंत्री धनंजय मुंडे यांच्या संदर्भात सातत्याने आक्षेपार्ह वक्तव्य, घरात घुसून मारण्याबाबतचे वक्तव्य केल्याप्रकरणी जरांगे यांच्या विरोधात धनंजय मुंडे समर्थक गणेश खाडे यांनी तक्रार दिली. त्यानुसार जरांगे पाटील यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.