ग्रंथ ज्ञानाचे सर्वोत्कृष्ट माध्यम
esakal January 10, 2025 10:45 PM

37634

ग्रंथ ज्ञानाचे सर्वोत्कृष्ट माध्यम

सदानंद पवार ः देवगडातील बर्वे ग्रंथालयामध्ये ‘वाचन संकल्प महाराष्ट्र’ उपक्रम

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १० ः ग्रंथ हे ज्ञान मिळविण्याचे एक सर्वोत्कृष्ट माध्यम आहे. वाचनाने माणूस समृद्ध होतो. ग्रंथालयातील उत्तमोत्तम ग्रंथांचे वाचन व चिंतन करायला हवे, असे मत साहित्यप्रेमी सदानंद पवार यांनी येथे व्यक्त केले. ग्रंथप्रदर्शन स्तुत्य उपक्रम असून वाचनाचा दृढ संकल्प नववर्षाच्या निमित्ताने करूया असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
येथील उमाबाई बर्वे ग्रंथालयामध्ये ‘वाचन संकल्प महाराष्ट्र’ या उपक्रमांतर्गत ग्रंथप्रदर्शन भरविण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन श्री. पवार यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ग्रंथालय आणि शब्दांगण पुणे यांच्या सहकार्याने ग्रंथप्रदर्शन भरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माजी आमदार अॅड. अजित गोगटे यांनी ‘समाजामध्ये आदर्श व्यक्तिमत्व घडविण्यासाठी वाचनाचा छंद जोपासायला हवा. ग्रंथप्रदर्शनामुळे विविध विषयांवरील पुस्तकांची माहिती होते. ग्रंथप्रदर्शनाच्या माध्यमातून वाचन सस्कृती वृद्धिंगत होते, असे सांगितले. यावेळी ग्रंथालयाचे अध्यक्ष गुरूदेव परूळेकर, उपाध्यक्ष गणेश बांदकर, सचिव सीताराम पाटील, संचालक सदस्य दत्तात्रय जोशी, महेश खोत, मधुरा कुबल, गौरव गोगटे तसेच महेश कानेटकर आदी उपस्थित होते. श्री. परूळेकर यांनी श्री. पवार, अॅड. गोगटे आणि श्री. राठीवडेकर यांचे स्वागत करून आभार मानले. ग्रंथपाल प्रशांत बांदकर यांनी प्रास्ताविक केले. शब्दांगणचे हे पुस्तक प्रदर्शन सोमवारपर्यंत (ता.१३) सकाळी १० ते रात्री ८.३० या वेळेत सुरू राहणार आहे. या पुस्तक प्रदर्शनामध्ये विविध विषयांची पुस्तके ५० टक्केपर्यंत सवलतीत उपलब्ध आहेत. दरम्यान, या प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री. परूळेकर यांनी केले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.