37476
गोगटे विद्यामंदिरमध्ये
‘रस्ता सुरक्षा अभियान’
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १० ः अपघाताचे प्रमाण लक्षात घेता रस्ता सुरक्षा अतिशय संवेदनशील बाब बनली आहे. रस्ता सुरक्षा सामुदायिक जबाबदारी मानून हा संस्कार प्रत्येकाने स्वतःमध्ये रुजवायला हवा, असे आवाहन जिल्हा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांनी जामसंडे येथे केले.
प्रत्येकाने जागरुकता बाळगल्यास रस्ता अपघातांचे प्रमाण शून्यावर आणता येईल. असेही त्यांनी यावेळी सांगितले. जामसंडे येथील श्री. मो. गोगटे माध्यमिक विद्यामंदिरमध्ये ‘रस्ता सुरक्षा अभियान २०२५’ या अनुषंगाने श्री. काळे बोलत होते. मंचावर मुख्याध्यापक सुनील जाधव यांच्यासह अन्य उपस्थित होते. श्री. काळे यांनी, रस्ता सुरक्षा देशातील अतिशय संवेदनशील, काळजी करायला लावणारी बाब आहे. दरवर्षी हजारो व्यक्ती रस्ते अपघातात मरण पावतात, तर शेकडो जायबंदी होतात. निष्काळजीपणा, दुर्लक्ष, वाहनांमधील नादुरुस्तता, वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली, बेदरकारपणा आणि अमर्याद वेग आदी कारणांनी अपघात घडतात. रस्ता सुरक्षिततेबाबत जागरुकता बाळगली गेल्यास अपघाताचे प्रमाण कमी करता येईल, असे सांगितले. प्रास्ताविक श्री. जाधव यांनी केले.