जीवनात हवे 'रीड', 'रीराईट' 'रीवाइज'
esakal January 10, 2025 10:45 PM

37415


जीवनात हवे ‘रीड’, ‘रीराईट’ ‘रीवाइज’

जिल्हाधिकारी पाटील ः बॅरिस्टर नाथ पै सेंट्रल स्कूलमध्ये ‘स्मृतिगंध’चे उद्घाटन

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ९ ः शालेय जीवनाचा काळ व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत महत्त्वाचा असतो. विद्यार्थ्यांचा अभ्यास करून घ्या, योग्य ज्ञान द्या; पण त्याचबरोबर जीवन शिक्षणही द्या. जीवनात तीन आरचा वापर करा ते म्हणाजे, ‘रीड’, ‘रीराईट’ आणि ‘रीवाइज’. अध्ययन-अध्यापनाची भाषा बदलली तरी जीवनमूल्ये, संस्कृती बदलू देऊ नका, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी केले.
बॅरिस्टर नाथ पै सेंट्रल स्कूलच्या ‘स्मृतिगंध’ स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. जिल्हाधिकारी पाटील म्हणाले, ‘‘ज्ञान मिळवायचच; पण त्याबरोबर आपल्यातील कलेला न्याय दिला पाहिजे. पालकांनी आपल्याला काय आवडते, यापेक्षा मुलांची आवड कशात आहे त्याचा शोध घेऊन मुलांना काय व्हायचे आहे ते बघितले पाहिजे. त्यांच धेय्य ते साध्य करू शकतात. विद्यार्थ्याला मनाच्या तंदुरुस्तीबरोबर शरीराच्या तंदुरुस्तीसाठी खेळ खेळायची सवय लावा. खेळामुळे हार-जीत पचवायची ताकद येते. आत्मविश्वास वाढतो. जीवनात तीन आरचा वापर करा ‘रीड’, ‘रीराईट’ आणि ‘रीवाइज’. जेणेकरून आपले ज्ञान पक्के होईल. असे सांगून मुलांच्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम फार मोलाची भूमिका बजावत असतात आणि याकडे बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन व त्यांचे शिक्षक, सहकारी जे उपक्रम राबवीत आहेत ते खरोखरच स्तुत्य आणि गौरवास्पद आहेत.’’
व्यासपीठावर कुडाळचे तहसीलदार वीरसिंग वसावे, संस्था चेअरमन उमेश गाळवणकर, सीईओ अमृता गाळवणकर, डॉ. जी. टी. राणे, डॉ. सई राणे व पालक प्रतिनिधी विठ्ठल सावंत, फिजीओथेरपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरज शुक्ला, कला, वाणिज्य आणि विज्ञान महिला व रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य अरुण मर्गज, बॅ. नाथ पै बी. एड. महाविद्यालयाचे प्राचार्य परेश धावडे, अविनाश वालावलकर , सेंट्रल स्कूलच्या प्राचार्य चैताली बांदेकर, नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्य कल्पना भंडारी आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी व उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून स्नेहसंमेलनाचे उद्घाटन करण्यात आले.
उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते गणित ऑलिपियाड व त्रिकोमिती ऑलिंपिक व वेतोबा मालिकेत काम केलेल्या साहिल सातार्डेकर याचाही तसेच या स्पर्धांमध्ये नेत्रदीपक यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकारी पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मंदार जोशी, चित्रा कुंटे व विश्वजीत डांगमोडेकर आदींनी सूत्रसंचालन केले. बाल कलाकारांनी विविध वैयक्तिक व समूहनृत्य सादर केले.
----
कलागुणांना शाळेतूनच प्रोत्साहन द्या
डॉ. राणे म्हणाले, ‘‘हे स्नेहसंमेलन नुसते संमेलन नव्हे तर लहान मुलांच्या आठवणीचा खजाना आहे. शाळा ही ज्ञान देणारी नुसती जागाच नाहीये; तर व्यक्तिमत्त्वाची जडणघडण करणारे एक केंद्र आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना शाळेतूनच प्रोत्साहन द्या. जेणेकरून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल. बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमाचे व्यासपीठ हा एक छोटा प्रोग्रॅम ठरत नाही; तर व्यावसायिक कलात्मकतेच इथे फिलिंग जाणवत राहतं.’’ तहसीलदार वसावे म्हणाले, जीवनात कलाही फार महत्त्वाची आहे. आपल्यातील कलागुण जिवंत ठेवा. कलेसोबत जगा. जेणेकरून जीवनाला रंगत प्राप्त होईल, असे सांगून कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.