नागपूर : विधानसभा निवडणुकीत विरोधकांना घवघवीत यश मिळण्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामाचा मोठा वाटा आहे, असं कौतुक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. तसेच, विधानसभा निवडणुकीत आपण गाफील राहिलो, अशी कबुलीही त्यांनी दिली. शरद पवार यांच्या वक्तव्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Devendra Fadnavis reaction to Sharad Pawar praising the ruling party)
नागपुरात आज जिव्हाळा पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमावेळी प्रसिद्ध वक्ते आणि प्रवचनकार विवेक घळसासी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. यावेळी चर्चेदरम्यान फडणवीसांना प्रश्न विचारण्यात आली की, शरद पवार अचानक संघाची स्तुती करायला लागल्यामुळे लोकांना वाटतेयं की, हे खरंच हृदय परिवर्तन आहे की, एका नव्या तडजोडीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे का? यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळी एक फेक नरेटीव्ह महाराष्ट्रामध्ये सेट करण्यामध्ये महाविकास आघाडीला यश आलं. हे यश मिळाल्यानंतर महाविकास आघाडीचा अतिआत्मविश्वास देखील वाढला. त्यांना वाटलं की, आपण अशाप्रकारचा फेक नरेटीव्ही लोकांमध्ये रुजवून सत्तेवर येऊ शकतो. तसेच आमच्याकरता देखील तो एक धक्का होता. आम्ही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये किमान महाराष्ट्रामध्ये तरी माझ्यासहीत सगळ्यांना अतिआत्मविश्वास होता की, आम्ही जिंकत आहोत. त्यामुळे महाविकास आघाडी जे सांगत होती, संविधान बदलणार आणि वोट जिहाद होणार याचा काही लोकांवर परिणाम होणार नाही. परंतु दुर्दैवाने याचे परिणाम झाल्याचे आम्ही पाहिले, अशी खंत त्यांनी बोलून दाखवली.
– Advertisement –
हेही वाचा – CM Fadnavis : एकनाथ शिंदे कसे झाले तयार? मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला तो किस्सा
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणूक होणार होती. त्यामुळे आम्ही विचार परिवाला विनंती केली की, तुम्ही राजकारणामध्ये काम करत नाही किंवा राजकारण हा तुमचा प्रांत नाही. पण आताची परिस्थिती अशी आहे की, अराजकतावादी ज्या शक्ती आहेत, त्या शक्तींविरोधात राष्ट्रीय विचारांच्या शक्तींनी उतरण्याची गरज आहे. राष्ट्रीय विचारांच्या ज्या शक्ती आहेत, ज्यांचा मूळ विचार राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे, अशा विविध क्षेत्रातल्या लोकांनी केवळ अराजकतेच्या विरोधात लढायचं आहे म्हणून विधानसभा निवडणुकीमध्ये आपापली भूमिका आपापल्या क्षेत्रात उत्तमपणे निभावली. त्यामुळे जो फेक नरेटीव्हचा तयार झालेल्या बागुलवुवाला एका मिनिटात टाचणी लागली. लोकसभेपेक्षा विधानसभेचे निकाल हे पूर्णपणे वेगळे लागले. किंबहुना महाविकास आघाडी विधानसभेत धुऊन निघाली, असे म्हणत फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.
– Advertisement –
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शरद पवार अतिशय चाणाक्ष आहेत. निश्चितपणे त्यांनी या पराभवाचा अभ्यास केला आहे. एवढं मोठं आम्ही तयार केलेलं वायुमंडल एका मिनिटात पंक्चर करणारी शक्ती कोण? असा प्रश्न त्यांच्या मनात आला असावा. यानंतर त्यांच्या लक्षात आलं की, ही शक्ती नियमित राजकारण करणारी नसून राष्ट्रकारण करणारी शक्ती आहे. त्यामुळे शेवटी प्रतिस्पर्धाचंही कौतुक करावं लागलं, त्या हिशोबाने त्यांनी कौतुक केलं असावं, असं माझं मत आहे, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावला. याचवेळी त्यांना विचारण्यात आले की, शरद पवार यांनी कौतुक केल्यामुळे जवळीक तर वाढणार नाही ना? यावर देवेंद्र फडणवीस यांच्यासह तिथे उपस्थित सर्वांना हसू अनावर झाले.
हेही वाचा – Local Government Bodies : महायुतीचे संकेत देताना उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा, म्हणाले…