अयोध्येतील विकासाचे नवे पर्व
esakal January 11, 2025 12:45 PM

- प्रमोद मुजुमदार

अयोध्या येथे मर्यादापुरुषोत्तम प्रभू श्रीरामाच्या बालक रामललाच्या मूर्तीची गेल्यावर्षी अर्थात पौष शुक्ल द्वादशी (२२ जानेवारी २०२४) रोजी विधिवत प्राणप्रतिष्ठा झाली. त्या सोहळ्याला तिथीनुसार आज एक वर्ष पूर्ण होत आहे. या निमित्ताने अयोध्या येथे झालेला विकास लक्षणीय आहे.

न्यायालयाच्या निकालाप्रमाणे नरेंद्र मोदी सरकारने अयोध्येमध्ये मंदिर बांधण्यासाठी एका न्यासाची स्थापना केली. त्याद्वारे मंदिर निर्माणाचे काम अतिशय वेगाने सुरू झाले. गेल्या २२ जानेवारीला रामलला मूर्तीची प्राणप्रतिष्ठा विधिवत झाली. या मंदिराच्या परकोटा परिसरामध्ये एकूण १८ मंदिरांच्या निर्माणाची कामे सुरू आहेत. यामध्ये दशावतार, शेषावतार, निषादराज, शबरी, अहल्या, संत तुलसीदास, शिव, माँ दुर्गा, अन्नपूर्णा, श्रीगणेश, हनुमान, आदींचा समावेश आहे.

संपूर्ण मंदिर प्रकल्प जून २०२५ पर्यत पूर्ण होईल, असा अंदाज व्यक्त होत आहे. अयोध्येमध्ये राममंदिर आणि प्राणप्रतिष्ठा झाल्यामुळे देशभर एकूण वातावरण राममय झाले होते, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. हिंदू समाजाने आपल्या एकजुटीचा, संघटनशक्तीचा परिचय संपूर्ण देशवासीयांना करून दिला आहे. ही संघटित शक्ती प्रभू श्रीरामाच्या प्रेरणेमुळेच आहे.

हिंदू समाज आपल्यावर होत असलेल्या अन्यायाचा मुकाबला सामूहिक संघटित शक्तीद्वारे करतो तर दुसरीकडे तो समाजातील अनिष्ट प्रथा, जातीय भेदाभेद, दूर करण्यासाठी रचनात्मक कार्यामध्ये दीनदलित, पीडित, शोषित, वंचिताचे जीवनमान उंचावण्यासाठी, त्यांच्या आरोग्याची काळजी, अन्य समाज घटकांबरोबर आणण्यासाठी हिंदू समाज सक्रिय भूमिका निभावत असल्याचे दृश्य आपल्याला पाहावयास मिळते.

‘संघटन में शक्ती है...’ याची प्रचिती दिसते.राममंदिराच्या निर्मितीसह आता संपूर्ण अयोध्या आणि आजूबाजूच्या परिसराचा सर्वांगीण विकास आणि त्यासंबंधी विविध प्रकल्प उत्तरप्रदेशच्या योगी सरकारने हाती घेतलेले आहेत. यात प्रमुख रस्त्यांच्या रुंदीकरणास सुशोभीकरण, साफसफाई स्वच्छता तसेच रेल्वेमार्ग आणि त्याचे जाळे मोठ्या प्रमाणावर विकसित झालेले आहे.

अयोध्येचे रेल्वेस्थानक पाहताना आपण विमानतळावर आलो की काय? असा भास होतो, इतके चांगले अत्याधुनिक स्थानक बांधले आहे. या ठिकाणी नवीन विमानतळाची उभारणी केली आहे. त्याचे ‘महर्षी वाल्मीकी आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे नामकरण केले असून ते देशभरातील प्रमुख मोठ्या महानगरांशी जोडले आहे. रेल्वे आणि विमानाच्या सुविधेमुळे आता दिवसागणिक श्रीराम मंदिरात दर्शनाला येणाऱ्या भाविकांची संख्या लाखोंच्या घरात पोचली आहे.

अनेक सुविधांची निर्मिती

वर्षभरात सुमारे साडेचार ते पाच कोटी भाविकांनी मंदिराला भेट दिल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. प्रयागराजला महाकुंभ सुरू होत असल्याने वाराणसी व अयोध्या येथे येणाऱ्या भाविकांची संख्या निश्चितच वाढणार आहे. अयोध्येत येणाऱ्या भाविकांच्या सोयी सुविधांसाठी तीर्थक्षेत्र ट्रस्टने अनेक आवश्यक सुविधा निर्माण केल्या आहेत. ज्येष्ठ नागरिक आणि वृद्धांसाठी व्हीलचेअरची निःशुल्क व्यवस्था केलेली आहे.

मौल्यवान किमती सामान सुरक्षित ठेवण्यासाठी लॉकरची सुविधा केली आहे. भाविकांना तातडीने उपचार उपचार उपलब्ध होण्यासाठी अपोलो हॉस्पिटल आणि तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या पुढाकाराने एक आपातकालीन, सुसज्ज रुग्णालय उभे केले आहे. भाविकांची आणि पर्यटकांची दररोजची वाढती संख्या लक्षात घेता हॉटेल, गेस्टहाऊसचे नवीन बांधकाम मोठ्या प्रमाणावर सुरू झाले आहे.

यात पंचतारांकित हॉटेलचाही समावेश आहे. सोबत टॅक्सी व्यवसाय वाढत आहेत. परिणामतः राज्य सरकारच्या तिजोरीमध्ये जीएसटीच्या रूपाने अतिरिक्त उत्पन्न सुरू झाले आहे. ही महत्त्वपूर्ण उल्लेखनीय बाब आहे. मंदिरासाठी दररोज मातीचे दिवे किंवा पणती यांची आवश्यकता असते. यासाठी आजूबाजूच्या परिसरातील कुंभारांना भरपूर मोठ्या प्रमाणावर काम मिळाले आहे.

त्याचबरोबर प्रसाद-फुले यांची उलाढालही वाढली आहे. मंदिर परिसरात असलेल्या दुकानदारांची रोजची विक्री वाढली आहे आणि यात प्रामुख्याने श्रीरामाच्या मूर्तीची मागणी अधिक आहे. पूर्वी मंदिराच्या प्रतिकृतीची अधिक विक्री होत होती. प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर श्रीरामाच्या मूर्तीच्या विक्रीत वाढ झाली आहे. एकूण सर्वांगीण उलाढाल वाढली असून त्या माध्यमातून सरकारचे ‘जीएसटी’चे उत्पन्नही वाढले आहे.

भविष्यात अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाच्या दर्शनाला आल्यावर मंदिराच्या पुनर्निर्मितीसाठी झालेल्या संघर्षाची आठवण सतत होत राहीलच. त्यासोबत आता या नव्या मोदी-योगी युगामध्ये अयोध्येचा सर्वांगीण विकास, प्रगती, कायापालट हादेखील प्रत्यक्ष अनुभवता येईल, एवढे मात्र निश्चित!

(लेखक दिल्लीस्थित ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.