निवासी अभारतीय !
esakal January 11, 2025 01:45 PM

अरविंद जगताप jarvindas३०@gmail.com

परदेशात स्थलांतरित होणाऱ्या भारतीयांची संख्या प्रचंड वाढत चाललीय. लाखो लोक एनआरआय होताहेत. गरीब किंवा श्रीमंत कुठल्याही आई-बापाच्या मनात आपल्या मुलाला परदेशात पाठवायचं स्वप्न आहे. अनिवासी भारतीय वाढताहेत. वाढू देत. खरी चिंता आहे, आपण मोठ्या संख्येने मनाने निवासी अभारतीय होत चाललोय?

गेल्या काही वर्षांत भारतातून परदेशात स्थलांतरित होणाऱ्या लोकांची संख्या प्रचंड वाढलीय. लाखो लोक एनआरआय होताहेत. त्यांच्यासाठी अमेरिका ही पहिली पसंती आहे. मग युरोप स्वर्ग वाटणारे लोक आहेत आणि काहीच नाही झालं तर दुबई, सौदी अरेबिया, कुवेत आहे; पण देश सोडून जाण्याची ही कुठली हौस आहे? असा सहजासहजी कुणी देश सोडून जातो का? एकेकाळी आपण गांधी, टिळक वगैरे लोकांना परदेशात गेले म्हणून शुद्धीकरण करायला लावलेले लोक.

परदेशात जाण्याने माणूस बाटला जातो. म्हणून खूप लोकांनी त्या काळी इच्छा असूनही उच्च शिक्षण घेतलं नाही परदेशात जाऊन. खूप आधुनिक गोष्टी शिकता आल्या नाही. खूप काळ जगात काय चाललंय ते लक्षात आलं नाही. त्यामुळे युद्धात पराभव स्वीकारावा लागला. समुद्रातून येणाऱ्या शत्रूपासून कायम दबून राहावं लागलं.

पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच किंवा मुघल कुठून आले, हे पाहायलासुद्धा आपण कित्येक वर्षं गेलो नाही. हळूहळू इंग्रज लोकांच्या सहवासात आपले लोक इंग्लंडला जाऊ लागले. त्या काळात सरदार पटेल, गांधी, नेहरू, सुभाषबाबू, बाबासाहेब आंबेडकर, सावरकर असे सगळे मोठे नेते परदेशात जाऊन शिकले. स्वातंत्र्य आणि सुधारणा या गोष्टींवर बोलू लागले. तरीही स्वातंत्र्य मिळाल्यावरसुद्धा परदेशात शिक्षणासाठी जाण्यातच उत्साह होता; स्थायिक होण्यासाठी नाही. ती काही ठरावीक लोकांची मक्तेदारी होती.

गुजराती, पंजाबी आणि दाक्षिणात्य लोक वेगवेगळ्या देशांत पहिल्यापासून जात राहिले. आपले नातेवाईक बोलवत राहिले; पण हे लोण समोरून देशात पसरलं नव्हतं. आता मात्र परदेशात जाणं हे सगळ्यात मोठं स्वप्न आणि ध्येय बनलंय.

आपली शिक्षण व्यवस्था जणू काही परदेशात नोकर, तंत्रज्ञ पाठविणारी यंत्रणा बनलीय. गरीब किंवा श्रीमंत कुठल्याही आई-बापाच्या मनात आपल्या मुलाला परदेशात पाठवायचं स्वप्न आहे. त्यासाठी पैसा कमवायचा आहे. अचानक लाखो रुपये सेव्हिंग करायची टूम आलीय ती यासाठी. मुला-मुलींना काहीही करून परदेशात पाठवता आलं पाहिजे. व्हिसा मिळावा, म्हणून देव पाण्यात ठेवणारे आई-बाप आहेत. व्हिसासाठी दक्षिणेत एक विशेष मंदिर आहे. शाळेतली मुलं युरोप-अमेरिकेवर जास्त बोलतात. तिकडची निवडणूक, तिकडचे उद्योगपती त्यांचे आदर्श आहेत.

फुटबॉल आणि बास्केटबॉल आवडतो; हे सांगणं आधुनिक असण्याचं लक्षण आहे. युरोप किती भारी आहे, आम्ही सुट्टीत जाणार आहोत, गेलो होतो या चर्चा आता मध्यमवर्गात पण सुरू आहेत. आपल्या देशात काहीच कसं नीट नाही; अशा चर्चा करणारे खूप भेटतील. अर्थात सगळंच नीट आहे असा मुद्दा नाही, पण आपल्या देशाविषयी असं कसं बोलू शकतात माणसं? मी माझ्या मुलांना या देशात ठेवणार नाही, असं सांगणारी शेकडो माणसं भेटली.

देश सोडून जायचं कारण काय? प्रदूषण, स्वच्छता हे मुद्दे आहेत. भ्रष्टाचार हा मुद्दा पण योग्य; पण समस्येवर उपाय शोधायचा का पळून जायचं?

खूप लोकांशी बोलल्यावर लक्षात आलं, की त्यांचा राजकारणावर नको तेवढा विश्वास आहे. काहीही झालं तरी राजकारणी सुधारणार नाहीत आणि आपली शहरंही सुधारणार नाहीत, याची या लोकांना खात्री आहे. आपल्या मुलाला, मग सुनेला, मग आई-वडिलांना कधी एकदा अमेरिकेत जाऊन सेटल करतो, या चिंतेत लाखो लोक आहेत. व्हिसाची लांबलचक वेटिंग लिस्टच आहे.

शाळेत असल्यापासून युरोप, अमेरिकेत जाण्यासाठी लागणाऱ्या परीक्षेची तयारी चालू आहे. तिकडे कामी येईल अशी परकी भाषा शिकण्यासाठी रांग आहे. काही लोकांपुढे तर मांसाहारी कसं व्हायचं ही समस्या आहे; पण तो प्रश्न भारतात असतो. लोक काय म्हणतील? परदेशात कुणी काही म्हणत नाही.

मुलांच्या मनात सातत्याने तुला परदेशात जायचंय हे बिंबवलं जातंय. या विषयावर चिंता व्यक्त करावी तर काही लोक म्हणतात, तशीही आपली लोकसंख्या एवढी भरमसाट आहे, जाऊ द्या जाताहेत तर... म्हणजे तीन-चार मुलं आहेत; तर एखादं द्या दुसऱ्याला. कारण परदेशात जाणं, हा काही एखाद्या देशाच्या समस्येवरील उपाय नाही.

आपल्याकडे सगळ्यात मोठी अडचण आहे; ती समस्या आहे, हे मान्य करायचं नाही. सोडवण्याचा विषय लांबच राहिला. परदेशात जाऊन देशभक्तीच्या मोठमोठ्या गप्पा मारणारे लोक पाहिले की हे लक्षात येईल. आपल्या देशाविषयी अभिमान पाहिजे, पण परदेशात बसून देशातल्या लोकांना देशभक्ती शिकवणं अत्यंत फालतू काम आहे. पळून गेलेल्या मुलीने घरी असलेल्या बहिणीला घराची मर्यादा आणि संस्कार यावर भाषण देण्यासारखं आहे. सिस्टीमच्या विरोधात लढताना भूमिगत झालेले, देश सोडून गेलेले क्रांतिकारी लोक वेगळे.

त्यांचं कायम देशाकडे लक्ष होतं किंवा संशोधन, व्यवसाय करायला परदेशात गेलेले लोक वेगळे. त्यांच्या कामाचा व्यापक फायदा असतो, पण केवळ हौस म्हणून, मोठेपणा म्हणून किंवा चैन करायची म्हणून जाणारे लोक वाढताहेत. या देशात आपल्याला सुख-सुविधा नाहीत, अशी बोंब वाढलीय आणि दुर्दैवाची गोष्ट ही आहे की ती आपण मान्य करायला तयार नाही. लोक जाताहेत का? जाताहेत. लोकांना जायचयं का? तर जायचंय, पण आपल्याला हे मान्य नाही की, आपलं काहीतरी चुकतंय.

आपली व्यवस्था गडबड आहे, हे कबूल करायला आपण तयार नाही. सगळ्यात जास्त स्थलांतर करताहेत ते श्रीमंत व्यापारी लोक. इथे गडगंज पैसा कमवून आता त्यांना भारत नकोसा झालाय. त्यानंतर या देशात उत्तम पदवी घेतलेले लोक. ज्यांनी खरं तर आपली सिस्टीम सुधारली पाहिजे; पण हे लोक या देशात राहण्याच्या मनःस्थितीत नाहीत. आधी यांचा राग यायचा; पण जेव्हा विचार करू लागतो की त्यांनी का राहायचं?

दोष या लोकांचाच नाही. आपल्या देशात प्रत्येक क्षेत्रावर राजकीय वर्चस्व आहे. शिक्षण, आरोग्य, व्यापार या सगळ्या गोष्टी राजकीय वर्चस्वाखाली आहेत. चांगल्या शिक्षणसंस्था, चांगल्या खेळाच्या संघटना, चांगले दवाखाने, चांगला व्यापार या सगळ्या गोष्टीत राजकीय हस्तक्षेप आहे.

जर प्रत्येक खेळाची संघटना राजकीय लोकांच्या ताब्यात असेल, तर काय खेळाडू निर्माण होणार? जर देशात होणाऱ्या प्रत्येक मोठ्या परीक्षेचा पेपर फुटत असेल, तर काय उत्तम अधिकारी तयार होणार? जर छोट्या तालुक्यात एखाद्या नेत्याचा चमचा दादागिरी करून शेकडो कोटीचा मालक होत असेल, तर गुणवत्ता अंगी असलेल्या माणसाने का राहायचं या देशात? मंत्र्यांच्या मागे-पुढे फिरून कोट्यधीश होणारे लोक बघून, प्रामाणिक माणूस किती काळ धुमसत राहणार? या देशात प्रत्येक मोठं कंत्राट मोजक्या दोनच व्यापाऱ्यांना मिळणार असेल, तर बाकी लोकांना काय उत्साह येणार या देशात? अशी असंख्य कारणं आहेत.

राजकीय नेते आपल्या मुला-मुलींना परदेशात पाठवतात. किमान आपल्या मुलांना इथे शिक्षण घेता यावे, ही व्यवस्था पण निर्माण करता आली नाही. त्यात काही नेते मुलांना इथे असुरक्षित वाटतं म्हणूनही बाहेर पाठवतात. यांच्या मुलांना असुरक्षित वाटतं आणि आपल्याला? केवळ परदेशात जाता आलं नाही तरी मनोमन एक दिवस जायचं, हा विचार घेऊन जगणारे पण खूप आहेत. अनिवासी भारतीय वाढताहेत. वाढू देत. खरी चिंता आहे, आपण मोठ्या संख्येने मनाने निवासी अभारतीय होत चाललोय?

(लेखक चित्रपट लेखक, गीतकार, दिग्दर्शक आणि ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाचे पत्रलेखक आहेत.)
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.