गौतमी देशपांडे
आई ही आईच असते. त्यामुळेच जगात प्रत्येक व्यक्तीसाठी सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती म्हणजे आई असते. खरंतर आईमुळे आमच्या घरामध्ये खूप बदल घडलेत. आमच्या आजी-आजोबांनी सांगितलं की, आई आल्यामुळे खूप चांगल्या गोष्टी आमच्या कुटुंबाला पाहता आल्या. कुटुंबाची परिस्थिती खूप बदलून गेली. आमचं पूर्ण कुटुंब एकसंध आणि जोडलेलं राहिलं.
खरंतर आईमुळे आम्हाला सर्वांत प्रचंड गोडी लागली ती गाण्याची, अभिनयाची आणि विज्ञानाची. आमच्या आईमध्ये प्रचंड समंजसपणा आहे. एखादी अडचण किंवा संकट आलं, तर परिस्थिती कशी हाताळायची, याची उत्तम जाण तिच्यामध्ये आहे.
एखादी गोष्ट किती ताणून धरायची आणि किती सैल सोडायची, हे आईकडून शिकण्यासारखं आहे. विशेष म्हणजे कुठल्याही गोष्टीला आई नावं ठेवत नाही. ‘जग खूप सुंदर आहे, सर्वच गोष्टी खूप छान आहेत’, अशी शिकवण आईनं आम्हाला दिली आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये चांगलं शोधणं, हा आईचा अत्यंत महत्त्वाचा गुण माझ्यात यावा, असं मला नेहमीच वाटतं.
खरंतर आईमुळेच मला अभिनयाची गोडी लागली. ज्यावेळी आईनं माझं पहिलं ‘गालिब’ हे नाटक पाहिलं, त्यावेळी आईला खूप बरं वाटलं. यापूर्वी मला अभिनयात अनेक पुरस्कार मिळाले, त्या वेळीही आईला खूप आनंद झाला होता; पण, ‘गालिब’ नाटकात मी केलेला अभिनय आईला खूप भावला.
कारण, नाटकामध्ये करिअर करण्याची आईची खूप इच्छा होती; पण काही कारणांमुळे तिला नाटकांमध्ये येता आलं नाही. आईचं हेच स्वप्न मी तिच्या डोळ्यांमध्ये पाहत असते अन् ‘गालिब’ नाटक पाहिल्यानंतर तिच्या स्वप्नपूर्तीचा प्रसंग मला तिच्या डोळ्यांत दिसला आणि मला अत्यानंद झाला.
खरंतर माझ्या आईमध्ये अनेक गुण आहेत. माझी आई अप्रतिम गायिका अन् अप्रतिम अभिनेत्रीही आहे. पूर्वी तिनं अनेक राज्य नाट्य स्पर्धा गाजविल्या आहेत. विशेष म्हणजे ती विज्ञान या विषयाची विद्यार्थिनीही आहे. आमच्यामध्ये जी कलेची बाजू आली, ती आईमुळेच आली.
आई मोहंमद रफी साहेबांची प्रचंड मोठी फॅन आहे. त्यामुळे ताई आणि मी अशा आम्ही दोघींनी आईला सरप्राईज देण्याचं ठरवलं होतं. आई-बाबांच्या लग्नाचा अठ्ठेचाळीसावा वाढदिवस होता. त्यावेळी ताई आणि मी प्लॅनिंग केलं अन् आई-बाबांना रफी साहेबांच्या घरी नेलं.
त्यावेळी दोघांनीही रफी साहेबांच्या कुटुंबीयांशी मनसोक्त गप्पा मारल्या. त्यांना मिळालेले पुरस्कार आणि रेकॉर्ड्स दोघांनाही पाहता आल्या. त्यावेळी आईच्या डोळ्यांमधील असलेली भावना माझ्या आयुष्यभर लक्षात राहील अशीच अविस्मरणीय आहे.
आई आणि बाबांना ट्रेकिंगचीही आवड आहे. त्यांच्यामुळे मलाही ट्रेकिंगची आवड लागली. कामाचा कितीही व्याप असला, तरी आई आमची प्रचंड काळजी घेते. सकाळपासून झालेल्या सगळ्या घडामोडी मी तिला एक मैत्रीण म्हणून सांगत असते. अनेकदा ती मला सल्लेही देत असते.
काही काही स्क्रिप्ट्स मी आईलाही पाठवते, त्यामुळे मी कोणती स्क्रिप्ट वाचते, हे तिच्या लक्षात येतं. काही गोष्टी खटकत असतील, तर ती मला आवर्जून सांगते. बरोबर असेल तर समर्थन करते आणि चुकीचं असेल, तर ठणकावून सांगते. ज्यावेळी आई एखाद्या गोष्टीचा निर्णय देते, त्यामुळे मला खूप पाठबळ मिळाल्यासारखं वाटतं. त्यामुळेच आई मला नेहमीच आधार वाटते. तिच्या प्रेमळ स्वभावामुळे ती मला हवीहवीशीच वाटते.
(शब्दांकन : अरुण सुर्वे)