राज्यात तीन प्रयोगशाळांत ‘एचएमपीव्ही’ चाचणी
पुणे, ता. १० : मानवी मेटान्यूमोव्हायरसच्या (एचएमपीव्ही) संशयित रुग्णांच्या घशातील स्रावांच्या नमुन्यांची तपासणी याआधी पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत (एनआयव्ही) होत होती. आता मुंबईच्या कस्तुरबा संसर्गरोग रुग्णालय व नागपूरच्या ‘ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स’मध्येही (एम्स) तपासणी होणार आहे. त्याचे जनुकीय क्रमनिर्धारणदेखील (जिनोम सिक्वेन्सिंग) या प्रयोगशाळांत केले जाणार आहे.
चीनमध्ये गंभीर तीव्र श्वसन आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असून त्याचे कारण प्रामुख्याने ‘एचएमपीव्ही’ म्हटले जात आहे. त्याबाबत स्पष्टीकरण देताना आरोग्य विभागाने हा विषाणू २००१ पासून अस्तित्वात असून, नेदरलँडमध्ये सुरुवातीचे काही रुग्ण आढळले होते. त्यानंतर जगातील बहुतांश सर्वच भागांत त्याचा प्रसार आढळला आहे. सामान्यतः या विषाणूंमुळे सौम्य श्वसन आजार उद्भवतात. मात्र, रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असलेल्या गटांतील अशा काही व्यक्तींना गंभीर आजार होऊ शकतो. आतापर्यंत हा विषाणू आनुवांशिकदृष्ट्या तुलनेने स्थिर आहे, असे स्पष्टीकरण दिले आहे.
प्रतिबंधात्मक उपायांमध्ये हात धुणे, खोकल्याचे शिष्टाचार पाळणे, संसर्ग झालेला पृष्ठभाग स्वच्छ करणे आणि संक्रमित व्यक्तींशी संपर्क टाळणे या उपाययोजनाही सुचविल्या आहेत. याबाबतचा आदेश राज्याच्या आरोग्य विभागाचे सचिव निपुण विनायक यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना व इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांना शुक्रवारी जारी केले.