बारामती, ता. ११ : ‘‘आगामी १०० दिवसांत करायच्या कामांचा कार्यक्रम शासनाने हाती घेतला आहे, त्याची अंमलबजावणी सर्वच विभागांनी करायची आहे. मुख्यमंत्र्यांनी आगामी १०० दिवसांत करायच्या कामांचा आढावा घेण्यास प्रारंभ केला आहे. शासनाकडून देण्यात येणाऱ्या सर्व निर्देशांचे सर्वच शासकीय अधिकाऱ्यांनी पालन करावे, हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही,’’ असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
अजित पवार यांनी शनिवारी (ता. ११) बारामतीतील विकासकामांची पाहणी केली. त्या दरम्यान त्यांनी अधिकाऱ्यांना अनेक सूचना केल्या. ते म्हणाले, ‘‘तालुक्यात असलेली विविध शासकीय कार्यालये, सार्वजनिक ठिकाणे, शाळा, महाविद्यालय, पोलिस ठाणे अशा ठिकाणांची मोहीम राबवून स्वच्छता करा. अनावश्यक कागदपत्रे काढून टाका. खराब आणि वापरात नसलेली वाहने काढून टाकावीत. अवैधरीत्या मद्य निर्मिती, वाहतूक विक्री तसेच गुन्हेगारी वृत्तीला आळा घालण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. घनकचरा आणि सांडपाण्याचे व्यवस्थापन करावे. शासकीय रुग्णालयात सेवा अधिक दर्जेदार पद्धतीने द्यावीत. असंघटित कामगारांना शासकीय योजनांचा लाभ देण्याकरिता आराखडा तयार करावा. शासकीय कार्यालयाचे संकेतस्थळ सुसज्ज करा. माहिती अधिकार कायद्यानुसार मागितली जाईल, अशी सर्व माहिती अगोदरच संकेतस्थळावर उपलब्ध करून द्या. नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे, यासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम आपल्या कार्यालयात राबविण्यात यावेत. नागरिकांना घरपोच सेवा उपलब्ध होईल, यादृष्टीने नियोजन करावे. नागरिकांच्या तक्रारी, प्रलंबित प्रकरणे निकाली काढावे. शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना पिण्याचे पाणी, स्वच्छ प्रसाधनगृह, उपलब्ध करून द्याव्यात. वृक्षारोपण करावे, अतिक्रमण होणार नाही, वाहतूक कोंडी कमी होईल यासह नियोजनासाठी कृत्रीम बुद्धिमत्तेची मदत घ्यावी. दिशादर्शक फलक, इलेक्ट्रॉनिक्स फलक लावावेत व नगरपालिकेने देखभाल दुरुस्तीसाठी उत्पन्नाचे नवीन मार्ग शोधावेत.’’
याप्रसंगी अतिरिक्त पोलिस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील, महावितरणचे मुख्य अभियंता धर्मराज पेठकर, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पवार, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल, गट विकास अधिकारी अनिल बागल, मुख्याधिकारी महेश रोकडे आदी उपस्थित होते.