कासारवाडी, ता.११ ः नेहरूनगर येथील कै. आण्णासाहेब मगर स्टेडियमला एकेकाळी पिंपरी-चिंचवडचे क्रीडा वैभव म्हणून पाहिले जात असे. या स्टेडियमधून शहराचा नावलौकीक वाढविणारे अनेक नामवंत खेळाडू घडले. मात्र, खेळाडूंच्या वैभवशाली प्रेरणास्थानाचा अक्षरशः कचरा डेपो झाला आहे. त्याच्या पुर्नविकासाचा प्रस्ताव मार्गी न लावता स्टेडियमचे आवारातच अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकाम विरोधी विभागाकडून केलेले जप्त साहित्य वर्षानुवर्षे भंगारात पडले असून त्याचे ढिगारे उभे राहिले आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरामध्ये असंख्य लहान-मोठे उद्योगधंदे वसले आहेत. त्यातील कामगार, खेळाडू आणि शाळा-महाविद्यालयीन खेळाडूंसाठी कै.अण्णासाहेब मगर स्टेडियम हे स्फूर्तीस्थान होते. या स्टेडियमवर राज्य कामगार कल्याण मंडळाच्या विविध स्पर्धा झालेल्या आहेत. मात्र राज्य कामगार कल्याण मंडळाकडून हे स्टेडियम महापालिकेकडे आल्यानंतर कालांतराने त्याला उतरती कळा लागली. स्टेडियमचा वापर आता अतिक्रमणविरोधी मोहीमेतील जप्त भंगार साठवण्यासाठी केला जात आहे. स्टेडियमध्ये फेरफटका मारण्यास येणारे नागरिक सुद्धा भंगाराच्या साहित्यामुळे प्रचंड त्रस्त झाले आहेत. मैदानात खेळाडूंनी खेळूच नये अशी जणू तजवीज करण्यात आली आहे. तीन ते चार वर्षांपूर्वी कोरोना सेंटरच्या वापरासाठी दिली होती. हे मैदान दिले होते. मात्र, ती सगळी जागा उखडलेली आहे.
काय आहे स्थिती ?
- कृत्रिम गिर्यारोहणासाठी भिंतीचा निव्वळ सांगाडा
- जलतरण तलावाचीही दुर्दशा, देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष
- मैदान उखडलेले; जमिनीतील खडीवर आल्याने खेळणे अशक्य
- आवारात जप्त साहित्यांचे ढिगारे
- पाणी साचून डासोत्पत्ती होण्याचा धोका कायम
कुठलाही नवीन प्रकल्प उभा करत असताना जुन्या प्रकल्पाकडे किंवा वास्तुकडे कुठल्या प्रकारे दुर्लक्ष होता कामा नये. अशा वास्तूंचे जतनच व्हायला हवे. खरंतर हे मैदान महानगरपालिकेच्या ताब्यात असताना अशा वास्तु किंवा प्रकल्प दुर्लक्षित होणे बरोबर नाही. अनेक वेळा स्टेडियमच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव मांडून सुध्दा याकडे आतापर्यंत दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामागचे नेमके कारण कळायला मार्ग नाही.
- समीर मासुळकर, माजी सभापती, क्रीडा विभाग
कै.आण्णासाहेब मगर स्टेडियम हे अतिक्रमण विरोधी विभागाने जप्त केलेले साहित्य टाकण्याची जागा नाही. शेजारील वसाहतीला त्याचा त्रास होऊ शकतो म्हणून त्याविषयी तत्काळ लिलाव प्रक्रिया राबवून ते साहित्य हटविण्याची कारवाई केली जाईल.
- नीलेश भदाने, उपायुक्त (मध्यवर्ती भांडार)
अतिरिक्त आयुक्तांच्या सुचनेनुसार प्रत्येक प्रभागाच्या अतिक्रमण विरोधी विभागाला पत्रव्यवहार करून या साहित्याविषयी माहीती मागविली आहे. परंतु अद्यापपर्यंत कोणत्याही विभागाने ही माहिती दिलेली नाही. ही माहिती मिळाल्याशिवाय त्या साहित्यांचा लिलाव करता येत नाही.
- बी.डी. दाभाडे, सहायक भांडार अधिकारी
नेहरूनगर भागासाठी सध्या अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाला निरीक्षक नसल्यामुळे अतिक्रमण विभागाचे काम प्रशासन अधिकारी यांच्या अधिपत्याखाली चालत आहे.
- सुभाष कुंभार, कार्यालयीन अधीक्षक, ''क'' प्रभाग
अतिक्रमण विभागाने जप्त केलेले साहित्य हा विषय मध्यवर्ती भांडार विभागाअंतर्गत येतो. परंतु साहित्य कुठे टाकायचे ? याविषयी तेच माहिती देऊ शकतात. जुन्या चलनावरचा क्रमांक बघून आठही प्रभाग याच ठिकाणी हे जप्त केलेले साहित्य टाकतो. या परिपत्रकाविषयी अद्याप प्रभागालाही काहीच कल्पना नाही.
- डी. डी. कांबळे, प्रशासन अधिकारी, ‘क’ प्रभाग
स्टेडियममध्ये अतिक्रमण विभागाने जप्त करून टाकलेल्या साहित्यांमुळे परिसरात दुर्गंधी पसरते. साहित्य कुठे टाकावे हा आमच्या विभागाचा विषय नाही. परंतु नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून वेळोवेळी तेथे आरोग्य विभागाच्यावतीने औषध फवारणी केली जाते व करत राहू.
- तानाजी दाते, सहायक आरोग्य अधिकारी, ‘क’ प्रभाग
कै. आण्णासाहेब मगर स्टेडीयम हे ऐतिहासिक असे खेळाचे मैदान असून त्यावर अनेक राज्यस्तरीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळाडू घडले आहेत. त्यामुळे त्याचे ऐतिहासिक महत्व जपले पाहिजे. त्याच्या खासगीकरणाचा हेतू असेल; तर ते होऊ नये. याउलट या स्टेडियमला महानगरपालिकेच्यावतीने विकसित करून पुन्हा त्याला गतवैभव प्राप्त करून दिले पाहिजे.
- राहुल भोसले, माजी नगरसेवक
हे स्टेडियम आम्हा खेळाडूंसाठी अतिशय महत्वाचे होते. कारण शहरात जवळपास असे स्टेडियम नाही. या मैदानातून अनेक खेळाडू घडले आहेत. त्यामुळे हे स्टेडियम खेळाडूंसाठी प्रेरणा स्त्रोत आहे. त्यामुळे या स्टेडियमचे महत्व लक्षात घेऊन ते पुन्हा विकसित करून खेळाडूंसाठी खुले केले पाहिजे.
- कमलेश वाळके, स्थानिक खेळाडू