IND vs IRL : जेमिमाहचं शतक, तिघींची अर्धशतकं, आयर्लंडसमोर 371 धावांचं आव्हान
GH News January 12, 2025 06:09 PM

वूमन्स टीम इंडियाने आयर्लंडसमोर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 371 धावांचं आव्हान ठेवलं आहे. टीम इंडियाने 50 षटकांमध्ये 5 विकेट्स गमावून 370 धावा केल्या. टीम इंडियाकडून जेमिमाह रॉड्रिग्स हीने सर्वाधिक धावा केल्या. जेमिमाहने शतक झळकावलं. तर तिघींनी अर्धशतकी खेळी केली. कर्णधार स्मृती मंधाना, प्रतिका रावल आणि हर्लीन देओल या तिघांनी अर्धशतकी खेळी केली. या चौघींनी केलेल्या या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने 370 धावांचा डोंगर उभा केला. आता भारतीय गोलंदाज आयर्लंडला किती धावांवर रोखतात? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

टीम इंडियाची बॅटिंग

टीम इंडियाची सरस सुरुवात झाली. कर्णधार स्मृती मंधाना आणि प्रतिका रावल या दोघींनी 156 धावांची सलामी भागीदारी केली. त्यानंतर स्मृती मंधाना आऊट झाली. स्मृतीने 54 बॉलमध्ये 10 चौकार आणि 2 षटकारांसह 73 धावा केल्या. स्मृतीनंतर दुसऱ्याच बॉलवर प्रतिका आऊट झाली. प्रतिकाने 61 बॉलमध्ये 67 रन्स केल्या.

त्यानंतर जेमिमाह रॉड्रिग्स आणि हर्लीन देओल या दोघींनी डाव सावरला आणि मोठी भागीदारी केली. या दोघींनी तिसऱ्या विकेटसाठी 183 धावांची भागीदारी केली. त्यानंतर हर्लीन 89 धावा करुन आऊट झाली. हर्लीनला शतक करण्याची संधी होती. मात्र अवघ्या 11 धावांनी तिची ही संधी हुकली. हर्लीनने या खेळीत 12 चौकार लगावले. हर्लीननंतर रिचा घोषने 10 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. तर जेमिमाह 50 व्या ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर आऊट झाली. जेमिमाहने 91 बॉलमध्ये 12 फोरसह 102 रन्स केल्या. तर तेजल हसबनीस आणि सायली सातघरे या दोघी नाबाद परतल्या. तेजल आणि सायली या दोघींनी प्रत्येकी 2 धावा केल्या. ओर्ला प्रेंडरगास्ट आणि अर्लीन केली या दोघींनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर जॉर्जिना डेम्पसी हीने 1 विकेट घेतली.

आयर्लंडसमोर 371 धावांचं आव्हान

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन: स्मृती मानधना (कर्णधार), प्रतिका रावल, हरलीन देओल, जेमिमा रॉड्रिग्ज, तेजल हसबनीस, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, सायली सातघरे, सायमा ठाकोर, प्रिया मिश्रा आणि तितस साधू.

आयर्लंड प्लेइंग ईलेव्हन: गॅबी लुईस (कर्णधार), सारा फोर्ब्स, कुल्टर रेली (विकेटकीपर), ओर्ला प्रेंडरगास्ट, लॉरा डेलानी, लीह पॉल, अर्लीन केली, अवा कॅनिंग, जॉर्जिना डेम्पसी, अलाना डालझेल आणि फ्रेया सार्जेंट.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.