ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेते आणि टेलिव्हिजन कलाकार टिकू तलसानिया यांना हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी सगळीकडे पसरली होती. पण आता याबाबत त्यांच्या पत्नीने स्पष्टीकरण दिलं आहे. टिकू तलसानिया यांना हृदयविकाराचा झटका आला नसून ब्रेन स्ट्रोक आल्याचं पत्नीने स्पष्ट केलं आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
70 वर्षीय टिकू तलसानिया एका सिनेमाच्या स्क्रीनिंगला गेले होते. तिथे त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना तात्काळ कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे.
टिकू यांनी आजवर हिंदी आणि गुजराती मनोरंजन विश्वात खूप काम केलं आहे. त्यांनी 250 हुन अधिक सिनेमांमध्ये काम केलं आहे. इतकंच नाही तर त्यांनी अनेक मालिकांमध्ये ही काम केलं आहे. टेलिव्हिजनवर त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या तर बॉलिवूडमध्ये ही अनेक सुपरस्टारसोबत त्यांनी स्क्रीन शेअर केली. देवदास मध्ये त्यांची देवदासच्या लाडक्या नोकराची भूमिका खूप गाजली. नुकतंच ते 'विकी और विद्या का वो वाला व्हिडिओ' या सिनेमात दिसले होते.
1984 मध्ये त्यांनी ये जो जिंदगी हे या मालिकेतून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. याशिवाय इश्क, जोडी नंबर 1, पार्टनर या सिनेमातील त्यांच्या विनोदी भूमिका गाजल्या.
त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी दीप्ती तलसानिया यांच्याशी लग्न केला आहे त्यांना एक मुलगा आणि मुलगी आहे त्यांचा मुलगा रोहन हा उत्तम गायक आहे तर शिखा ही त्यांची मुलगी अभिनेत्री आहे.