MP Brahmin Board Chief Urges Couples to Have 4 Kids : चार मुलं जन्माला घाला आणि १ लाख रुपयांचं बक्षीस मिळवा, अशी घोषणा मध्यप्रदेशमधील ब्राह्मण संघाने केली आहे. या घोषणेनंतर पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. यावरून विविध चर्चांनाही उधाण आलं असून यासंदर्भात अनेकांनी सोशल मीडियावर प्रतिक्रियाही दिली आहे.
मध्यप्रदेशातील ब्राह्मण संघाचे अध्यक्ष पंडित विष्णू राजोरिया यांनी ही घोषणा केली आहे. इंदौरमधील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी यासंदर्भात भाष्य केलं. ''मला तरुणांकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. भविष्यातील पिढीचं रक्षण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. मी त्यांना आवाहन करतो, त्यांनी किमान चार मुलं तरी जन्माला घालावी'', अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
पुढे बोलताना राजोरिया यांनी चार मुलं जन्माला घालणाऱ्यांना बक्षीस दिलं जाईल, असंही सांगितलं. ''जे दाम्पत्य चार मुलं जन्माला घालतील, त्यांना १ लाख रुपयांचं बक्षीस दिलं जाईल. मी ब्राह्मण मंडळाचा अध्यक्ष असो किंवा नसो, ही आर्थिक सुरु राहील'', असे ते म्हणाले.
दरम्यान, पंडित विष्णू राजोरिया यांच्या विधानानंतर काँग्रेसने त्यांच्यावर जोरदार टीका केली. ''राजोरिया हे सुशिक्षीत नेते आहेत. त्यांनी अशाप्रकारे विधानं करायला नको. आज लोकसंख्या ही सर्वात मोठी समस्या आहे. कमी मुलं असतील, तर त्यांच्या भविष्याचं योग्य ते नियोजन करता येईल'', असं काँग्रेस नेते मुकेश नायक म्हणाले.
महत्त्वाचे म्हणजे यावरून वाद निर्माण झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाने यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं. पंडित विष्णू राजोरिया यांनी केलेलं विधान त्यांचं वैयक्तिक मत आहे. या विधानाचा भारतीय जनता पक्षाशी कोणताही संबंध नाही, अशी प्रतिक्रिया पक्षाच्या नेत्यांकडून देण्यात आली.