Devendra Fadnavis On ShaktiPeeth Expressway : सह्याद्री अतिथीगृह येथे राज्य सरकारची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आगामी शंभर दिवसात सार्वजनिक बांधकाम विभागाने करावयाच्या कामकाजाचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. फडणवीस यांनी बैठकीत शक्तीपीठ महामार्गाच्या कामाच्या नियोजनाची तत्परतेने सुरुवात करण्याचे आदेश दिले आहेत.
राज्यातील धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या आणि पर्यटन उद्योग व्यवसायाला प्रोत्साहन देणाऱ्या शक्तीपीठ महामार्ग उभारणी ही दर्जेदार आणि गतीमानतेने करावयाचे आहे. शक्तीपीठ महामार्गाची नियोजन प्रक्रिया सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. यासाठी महामार्गांचे जाळे दर्जेदार आणि अधिक व्यापक करण्याच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागाने नियोजन करावे असेही फडणवीस यांनी बैठकीत म्हटले.
मुख्यमंत्री यांनी बोलावलेल्या बैठकीमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, श्रीमती मेघना बोर्डीकर, मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्यासह विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा म्हैसकर, सचिव सदाशिव साळुंखे, सचिव ए. दशपुते, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ व्यवस्थापक अनिल गायकवाड यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, नांदेड माहूरची रेणुका देवी या तीन शक्तीपीठांना जोडणारा महाराष्ट्रासाठी महत्त्वपूर्ण आहे. या महामार्गामुळे राज्यातील दळणवळण सुविधा वाढणार आहे. व्यावसायिक संधींसह पर्यटनाला गती मिळणार आहे. ८०२ किमी लांब शक्तीपीठ महामार्गाची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी २०२३ मध्ये केली होती. हा महामार्ग नागपूर ते गोवा असा असणार आहे. कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, वर्धा, यवतमाळ, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर अशा १२ जिल्ह्यांतून हा महामार्ग जाणार आहे.