Rohit Sharma joins Mumbai Ranji Trophy practice: २०२४ वर्षातील खराब फॉर्म मागे सोडून नव्या वर्षात दणक्यात सुरुवात करण्यासाठी रोहित शर्मा सज्ज झाला आहे. भारतीय कर्णधारासमोर चॅम्पियन्स ट्रॉफी हे पुढील आव्हान आहे आणि त्यासाठी रोहित सरावाला लागला आहे. मंगळवारी रणजी ट्रॉफीच्या सराव सत्रासाठी तो दाखल झाला आणि त्याने कसून सरावही केला.
आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या तयारीसाठी रोहित शर्माने MCA-BKC मैदानावर पुन्हा सराव सुरू केला आहे. मुंबई संघ त्यांच्या पुढील रणजी ट्रॉफी लीग फेरीसाठी तयारी करत असताना रोहित शर्माही त्यात सहभागी झाला. मुंबईचा पुढील सामना जम्मू-काश्मीर संघाविरुद्ध होणार आहे. रोहित रणजी करंडक स्पर्धेच्या या सामन्यात खेळेल का, याबाबत अद्याप स्पष्टता मिळालेली नाही.
'रोहित मुंबई रणजी करंडक संघासोबत सराव सत्रासाठी येणार आहे आणि तो जम्मू-काश्मीरविरुद्धचा पुढील रणजी सामना खेळणार की नाही हे अद्याप निश्चित झालेले नाही. तो योग्य वेळी एमसीएला कळवेल,'असे एमसीएच्या एका सूत्राने इंडियन एक्सप्रेसला सांगितले.
रोहितचा मुंबई संघासोबत शेवटचा रणजी करंडक सामना २०१५ मध्ये उत्तर प्रदेशविरुद्ध खेळला होता. भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात रोहितला चार कसोटी सामन्यांमध्ये १०.९३ च्या सरासरीने ३१ धावा केल्या होत्या. त्यानंतर सिडनी येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या कसोटीच्या प्लेइंग इलेव्हनमधून त्याने बाहेर बसण्याचा निर्णय घेतला होता.
रणजी करंडक स्पर्धेच्या पुढील लढती २३ जानेवारीपासून सुरू होत आहेत आणि विराट कोहली दिल्लीकडून खेळणार का याची उत्सुकता आहे. विराट २०१२ मध्ये शेवटचा रणजी सामना खेळला होता. दुसरीकडे फलंदाज शुभमन गिल कर्नाटक विरुद्ध पंजाबकडून खेळणार आहे. गिलला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तीन कसोटी सामन्यांमध्ये ३१, २८, १, २० आणि १३ धावा करता आल्या होत्या.