लोकप्रिय मराठी अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर हे चाहत्यांच्या आवडत्या जोड्यांपैकी एक आहेत. ते दोघेही सोशल मीडियावर चर्चेत असतात. त्यांचा चाहतावर्ग मोठा आहे. ते कायमच त्यांचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असतात. त्या दोघांनी लव्ह मॅरेज केलंय. मात्र ऐन लग्नाच्या दिवशी ते दोघे पहाटे साडेतीन वाजता भांडत होते. लग्नाच्या दिवशीच त्यांचं जोरदार भांडण झालेलं. सिद्धार्थने एका मुलाखतीत याबद्दल सांगितलं आहे.
सिद्धार्थ आणि मिताली पहिल्यांदाच 'फसक्लास दाभाडे' या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. ते या चित्रपटात नवरा बायकोची भूमिका साकारणार आहेत. त्यांना पहिल्यांदाच चित्रपटात एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. मात्र याच चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान दिलेल्या एका मुलाखतीत सिद्धार्थने त्यांचं लग्नदिवशीच मोठं भांडण झाल्याचं सांगितलं. चित्रपटाच्या टीमने नुकतीच नवशक्तीच्या युट्युब चॅनेलला मुलाखत दिली. यात बोलताना सिद्धार्थ म्हणाला, 'आम्ही नाचून-नाचून थकलो होतो. त्यानंतर आमच्या दोघांचं भांडण झालं. भांडण वेगळ्याच कारणावरून सुरू झालं होतं. कारण छोटच होतं, त्याचं रूपांतर खूप मोठ्या भांडणामध्ये झालं होतं.'
सिद्धार्थ पुढे म्हणाला, ' हे पहाटे साडेतीन वाजता सुरू होतं. त्यानंतर तीन तासांनी विधींना बसायचं होतं. तर साडेतीन वाजता आमच्या भांडणाला सुरूवात झाली. त्यानंतर हिच्या खोलीत दोन मैत्रीणी होत्या, त्या बाहेर आल्या. माझे भाऊ, मित्र वैगेरे बाहेर आले. एका पॉइन्टनंतर ते असं विचारायला लागले की आलार्म लावू ना सकाळचा?लग्नासाठी उठायचं आहे ना? तुमचं काय ठरलं आहे? ते जेव्हा बाहेर आले तेव्हा आम्ही एकमेकांना तुझे नातेवाईक बघ ना, असे मोठमोठ्याने म्हणत होतो.'
मिताली म्हणाली, 'जेव्हा आम्ही खूप भांडलो. त्यानंतर मी माझ्या खोलीत गेले. त्यानंतर पाच मिनिटानंतर सिद्धार्थ मला सॉरी म्हणायला आला.माझं चुकलं, सॉरी वैगेरे तो म्हणाला. त्यानंतर ते भांडण मिटलं.' 'फसक्लास दाभाडे' या चित्रपटात सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग व अमेय वाघ या तिघांनी बहीण-भावांची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट २४ जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.