मयुरेश कडव
बदलापूर : बदलापूर नगरपालिकेच्या विविध विभागांमध्ये अधिकाऱ्यांकडून कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे. या विरोधात आज नगरपालिका कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. इतकेच नाही तर नगरपालिका विरोधात घोषणाबाजी करत नागपालिकेच्या गेटवर पाचशे व शंभर रुपयांच्या नोटांचा हार घालत निषेध केला.
शहरात नगरपालिकेकडून विकास कामे केली जातात. या विकास कामांसाठी शासनाकडून निधी प्राप्त होत असतो. मात्र नगरपालिकेच्या नगररचना, बांधकाम, अतिक्रमण तसेच आरोग्य विभागात प्राप्त निधीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस हेमंत रूमणे यांनी केला आहे. या विभागात मिळून साधारण १५०० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचे च्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
राष्ट्रवादीने काढला आक्रोश मोर्चा
दरम्यान नगरपालिकेत झालेल्या भ्रष्ट्राचाराचा जाब विचारण्यासाठी राष्ट्रवादीच्या वतीने आज नगरपालिकेवर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. हातात निषेधाचे फलक घेऊन कार्यकर्त्यांनी पालिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे नगरपालिकेचा परिसर घोषणांनी दणाणून गेला होता.
गेटला बांधला पैशांचा हार
डफळे वाजवत व घोषणाबाजी करत राष्ट्रवादीकडून आक्रोश मोर्चा काढण्यात आला. मात्र नगरपालिकेच्या आवारात येण्यापूर्वीच सुरक्षा रक्षकांनी हा मोर्चा अडवून धरला. कोणालाही आतमध्ये प्रवेश न दिल्याने आंदोलकांनी नगरपालिकेच्या गेटलाच पाचशे व शंभर रुपयांच्या नोटांचा हार बांधत जोरदार घोषणाबाजी केली. तसेच भष्ट अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली