Walmik karad beed parli bandh News : समर्थकांच्या परळीत होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर परळीत आज तणावग्रस्त वातावरण आहे. वाल्मीक कराड यांच्यावर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याच्या मागणीसाठी कराड समर्थकांनी आंदोलनाची हाक दिली आहे. आज सकाळी दहा वाजता परळीमध्ये समर्थकांची बैठक होणार असून या बैठकीत आंदोलनाची दिशा निश्चित केली जाणार आहे. मंगळवारी झालेल्या आंदोलनात समर्थकांनी तीव्र आक्रमक भूमिका घेतली होती. काही समर्थकांनी आत्मदहनाचा प्रयत्नदेखील केला होता, ज्यामुळे शहरात तणाव निर्माण झाला होता. या घटनेनंतर पोलीस प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कडक उपाययोजना केल्या आहेत. बीड जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू असताना परळीत आंदोलन होण्याची शक्यता असल्यामुळे शहरात कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. एकीकडे बीड जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू केले असताना परळीमध्ये आंदोलन होत आहे.
राजकीय दबावाखाली गुन्हे दाखल करण्यात आले असून हे गुन्हे मागे घ्यावेत, या मागणीसाठी वाल्मीक कराडच्या आईसह समर्थकांनी परळी शहर पोलीस ठाणे बाहेर या आंदोलन केले होते. मंगळवारी रात्री हे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. आता आज सकाळी १० वाजता या समर्थकांची बैठक होणार आहे. या बैठकीतून आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाणार आहे.. दरम्यान, आंदोलनादरम्यान परळी शहर बंद ठेवण्यात आले होते. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात आला असून वरिष्ठ अधिकारी येथील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
दरम्यान दुसरीकडे आज वाल्मीक कराडला पुन्हा एकदा न्यायालयात हजर केले जाणार आहे. खंडणी प्रकरणातील पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. तर दुसरीकडे मोका अंतर्गत कारवाईसाठी एसआयटी आज ताबा मागणार आहे. त्याकरिता पुन्हा एकदा न्यायालयासमोर युक्तिवाद होणार असून न्यायालय या प्रकरणावर काय निर्णय देते ? याकडे लक्ष लागले आहे.