Shirala News : वारणा नदीत आढळला विवाहितेचा मृतदेह
esakal January 15, 2025 06:45 PM

शिराळा : चरण (ता.शिराळा) येथे करकव मळ्यात विष्णू नायकवडी यांच्या शेतात नजिक असणाऱ्या विद्युत मोटारच्या जवळ वारणा नदीत असणाऱ्या किंजळाच्या झाडाला अडकलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळून आला. कुरळप पोलिस ठाण्यात बेपत्ता असलेल्या तक्रारी वरून तो मृतदेह सौ. अमृता सागर कांबळे (वय २३, रा. वशी, ता. वाळवा) हिचा असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. आकस्मित मृत्यू म्हणून प्राथमिक नोंद कोकरूड पोलिसात झाली आहे. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली.याबाबत कोकरूड पोलिसात मारुती आनंदा घोलप (रा.चांदोली वसाहत, बागणी) यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत घटनास्थळ व कोकरूड पोलिसांनी दिलेली माहिती अशी,आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास शाहूवाडी तालुक्यातील सोंडोली येथील शेतात आलेल्या लोकांना वारणा नदीत चरण (ता. शिराळा) हद्दीत किंजळाच्या झाडास महिलेचा मृतदेह अडकलेल्या अवस्थेत दिसला. त्यांनी चरण येथील ओळखीच्या असणाऱ्या लोकांना माहिती दिली. चरणचे पोलीस पाटील अजित चव्हाण यांनी कोकरूड पोलिसांना याबाबत कळवले.

घटनास्थळी सहायक पोलीस निरीक्षक जयवंत जाधव, पोलीस हवालदार, राजेंद्र माने, पोलिस नाईक एन.जी.पवार, पोलिस हवालदार भाग्यश्री खोत यांनी भेट दिली. मृतदेहाचा चेहरा सडलेल्या अवस्थेत असल्याने ओळख पटणे अवघड होते.

त्यामुळे परिसरातील पोलीस ठाण्यात कोणी महिला बेपत्ता आहे का याची चौकशी केली.त्यावेळी वशी येथील अमृता कांबळे ही विवाहिता ३ जानेवारी दुपारी साडे बारा वाजता घरात कोणाला काही न सांगता निघून गेली असल्याची फिर्याद कुरळप पोलिसात नोंद होती.त्या नुसार नातेवाईक यांना बोलावून मृतदेह पाहिला असता तिच्या कानात असणार झुमका व हातात बांधलेल्या दोऱ्या वरून ती अमृता असल्याची खात्री पटली.कोकरूड येथे येथे शवविच्छेदन करण्यात आले.पुढील तपास हवालदार नागनाथ पवार करत आहेत.

अभिषेक काळे हा चांदोली येथे पोहण्यासाठी वारणा नदीत उतरला असता रविवारी बुडाला.त्याचा शोध सुरु असल्याने वारणा धरणातून वारणा नदी सोडलेले पाणी बंद करण्यात आले होते.त्यामुळे वारणा नदीचे पाणी कमी झाल्याने चरण येथील झाडास अडकलेला मृतदेह सहज दृष्टीस पडला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.